दहिसरची वाहतूककोंडी फुटणार, मेट्रो–9 चे काम लवकरच पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्याकरिता मेट्रो-9 ची मोठी मदत होणार असून येत्या काही दिवसांत या मेट्रोचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे दहिसरची वाहतूककोंडी फुटणार आहे तर शिवडी-न्हावा शेवा आणि कोस्टल रोडला जोडणारा वरळी-शिवडी जोडरस्त्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विविध प्रकल्पांचा ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. मेट्रो-9 चे पिलर आणि रिसरफेसिंगचे सध्या सुरू असलेले काम पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितच पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका परिसरातील वाहतूककोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने उपस्थित समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी संबंधितांना सूचना केल्या. या बैठकीला आमदार सदा सरवणकर, अजय चौधरी, नगरसेविका श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ, नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण, पालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

बेस्टच्या हो… हो… सेवेचे उद्या उद्घाटन

मुंबई शहराला भेट देऊ इच्छिणाऱया पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासन वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू करणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि जुहू बीच या दोन ठिकाणांहून ही बस सेवा एकाच वेळी कार्यान्वित होणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या नव्या बस सेवेचे 17 डिसेंबर रोजी सायं. 6.30 वा. वरळी आगार येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. होप ऑन – होप ऑफ (हो हो) या नावाने ही नवीन वातानुकूलित बस सेवा प्रत्येक 30 मिनिटांच्या अंतराने सुरू राहणार आहे. पर्यटक एका बसमधून उतरून पर्यटन स्थळाची पाहणी केल्यानंतर त्याच मार्गावरच्या दुसऱया पर्यटन बसमध्ये एकाच तिकिटावर प्रवास करू शकणार आहेत.