
मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ‘कोविड-19’ला रोखण्यासाठी पालिका पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. यासाठी दररोज तब्बल 16 हजार चाचण्या करण्यात येणार असून जास्तीत जास्त वेगाने रुग्ण आणि ‘क्लोज कॉन्टॅक्ट’ शोधून उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिवाय विनामास्क फिरणार्यांंवर कारवाई करण्यासाठी ‘मार्शल’ची नेमणूक करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 11 सप्टेंबरपर्यंत एकूण रुग्णसंख्या 165287 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 8064 झाला आहे. मात्र यातील 129244 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे आता फक्त 27626 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये मात्र आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केल्याचे आयुक्त चहल म्हणाले. 15 सप्टेंबरपासून मुंबईत ही मोहीम राबविण्यात येईल. यामध्ये कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे अनिवार्य असल्याने प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘मार्शल’ची नेमणूक करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यामध्ये विनामास्क फिरताना आढळल्यास 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. दंड वसूल केल्याची रीतसर पावतीदेखील देणात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.
दररोज पाच हजार खाटा रिक्तच राहतील
रुग्णवाढ होत असली तरी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक खाटांची व्यवस्था तैनात ठेवण्यात येत आहे. शिवाय दररोज हजारो रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत. त्यामुळे दररोज तब्बल पाच हजार खाटा रिक्त राहतील असा विश्वास आयुक्त चहल यांनी व्यक्त केला.
आता 70 टक्के ऑक्सिजन बेड
कोरोनाची लागण झाल्यास ऑक्सिजन लेव्हल 95 पर्यंत राखणे महत्त्वाचे असते. यापार्श्वभूमीवर पालिकेचे 70 टक्के बेड ऑक्सिजन सुविधायुक्त राहतील अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालिकेकडे सध्या 1415 आयसीयू बेड, 937 व्हेंटिलेटर आणि तब्बल 7812 ऑक्सिजन सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत.
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नसून वाढलेल्या चाचण्यांमुळे रुग्ण जास्त आढळत आहेत. रुग्णवाढ रोखण्यासाठी पालिका राबवत असणारी `माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने मुंबईसाठी, आपल्या कुटुंबासाठी जबाबदारीने वागले पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. – इकबाल सिंह चहल, पालिका आयुक्त




























































