अफवांना पूर्णविराम! जेफ्री एपस्टीनशी कोणताही संबंध नाही; दलाई लामांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फाईल्समध्ये अनेक दिग्गजांच्या नावाचा उल्लेख आहे. याप्रकरणातील व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीनशी असलेल्या संबंधांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या कार्यालयाने दलाई लामा यांचा जेफ्री एपस्टीनशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) प्रसिद्ध केलेल्या ‘एपस्टिन फाइल्स’मध्ये दलाई लामांचे नाव 169 वेळा आल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता. या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांच्या कार्यालयाने ‘X’ वर आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, दलाई लामा यांनी जेफ्री एपस्टिनची भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्या वतीने अशा कोणत्याही भेटीला कोणीही मान्यता दिलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.

अहवालांनुसार, न्याय विभागाच्या रेकॉर्डमध्ये दलाई लामा यांचे नाव वैयक्तिक ईमेल्स आणि ‘मसाज फॉर डमीज’ (Massage for Dummies) या सूचीमध्ये आढळले होते. ऑक्टोबर 2012 मधील काही ईमेल्समध्ये एका संभाव्य भेटीबद्दल किंवा काही कार्यक्रमाबद्दल चर्चा होती. जिथे एपस्टिन उपस्थित राहण्याची शक्यता होती. मात्र या केवळ चर्चा असून प्रत्यक्षात कोणतीही भेट झाली नसल्याचे दलाई लामा यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान एपस्टिन प्रकरणाशी संबंधित लाखो कागदपत्रे सार्वजनिक झाल्यामुळे जगभरातील अनेक राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

मी कधीच तिथे गेलो नाही; एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्प यांचा विरोधकांवर राजकीय कटाचा आरोप