
गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी निलंगा तालुक्यातील सावळी येथील मीरा दत्तात्रय सावरे यांचे एक हेक्टर वरील ऊस शेतीला जबरदस्त फटका बसला आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती मध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे .
मांजरा नदीपात्रात व तेरणा नदीपात्रात भरपूर प्रमाणात पाणी येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गातून तात्काळ शासनामार्फत पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठीची मागणी होत असल्यामुळे निलंगा तालुक्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी तालुक्यातील तेरणा व मांजरा नदीकाठच्या व इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व कृषी सहाय्यक , सर्व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व सर्व तलाठी यांना संयुक्तपणे पंचनामा करून अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.




























































