
सामना प्रतिनिधी, भिवंडी
पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या इमारतीचा काही भाग भिवंडीत कोसळला. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, घटनेनंतर सुमारे दोन तास या दुर्घटनेची माहिती पालिका आपत्कालीन कक्ष अथवा अग्निशमन दलाला नसल्याने जखमी कुटुंबीय या कोसळलेल्या इमारतीच्या आवारातच राहात होते. या घटनेमुळे येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भिवंडीतील धामणकर नाका येथील अमीन कंपाऊंड रोडकर नासिराबाग मस्जिदचा तळ अधिक ही एक मजली इमारत असून सुमारे पन्नास वर्षे जुनी इमारत अत्यंत मोडकळीस आली आहे. तिला खालील बाजूने सर्वत्र लाकडी टेकू लावलेले होते. तरीही या इमारतीमध्ये पागडी पद्धतीने पन्नास वर्षांपासून घर घेतल्याने रफिक कुरेशी व त्याचे कुटुंबीय तीन खोल्यांमध्ये राहात होत. त्याच खोल्यांचा भाग आज सकाळी कोसळून दुर्घटना घडली. यावेळी घरात असलेली रफिक कुरेशी यांची पत्नी मुमताज व तिची मुले शाहनवाज व नफिस यांच्या अंगावर घराचा भाग कोसळून मुमताज (50) गंभीर जखमी झाल्या असून मुलांना किरकोळ दुखापत होऊन जीवितहानी टळली आहे.

























































