दानोळीत दोन लाखांची गावठी दारू नष्ट, सहा संशयित पसार

329

येथील गावठी दारूभट्ट्यांवर जयसिंगपूर पोलिस व राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापे टाकून दारू तयार करण्याचे रसायन, गूळ, नवसागर, तयार दारू असा सुमारे दोन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. एकूण सात ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. यातील सहा आरोपी फरार झाले आहेत. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दानोळी येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या साह्याने दानोळी-निमशिरगाव रस्त्यावरील दगडू मंडले याच्या घरावर छापा टाकला. तेथे पोलिसांनी कच्चे रसायन, ११७५ किलो काळा गूळ, नवसागराच्या वड्यांचे पाकिट असा ३२ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट केला. यानंतर नामदेव धोंडीबा चव्हाण याच्या रानात छापा टाकून दोन सिंटेक्स टाक्यांमधील ३१ हजार रुपये किंमतीचे ६००लीटर कच्चे रसायन जप्त करून नष्ट केले. यानंतर अन्य पाच ठिकाणीही याच पद्धतीने कारवाई करून सुमारे १ लाख ७४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. एकूण २ लाख ३७ हजार ८६० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.

याबाबत कॉन्स्टेबल विजय पाटील व अमोल अवघडे यांनी फिर्याद दिली असून उदय अरुण माने, रमेश आप्पासो माने, अर्जुन चव्हाण यांच्यासह अन्य तीन अनोळखी संशयित फरार झाले आहेत. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, राज्य उत्पादन शुल्क पोलिस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयसिंग पाटील, पांडुरंग पाटील, संभाजी बेडगे, उल्हास शिंदे, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, जगन्नाथ पाटील, गणेश गुरव, अभिनंदन कांबळे, प्रवीण शेलार, माधव चव्हाण, अविनाश गाडगीळ, अतुल पाटील, विजय माने, सुभाष कोल्हे, गणपती हजारे, स्वप्नील मोेहिते, सुशांत बनसोडे, अमित तांबट, गणेश सानप, जयदीप ठोमके, राहुल गुरव, अनिल यादव, सचिन काळेल, संदीप जानकर, सागर शिंदे व जयसिंगपूर पोलिस या कारवाईत सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या