
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे एका गर्भवती महिलेला वेळेत १०२ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याच्या गंभीर प्रकारानंतर आरोग्य विभागाने संबंधित दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून संबंधित लिपिक आणि वाहनचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दोष सिद्ध झाल्यास लिपिकाची बदली, वेतनवाढ रोखणे तसेच कंत्राटी वाहनचालकाची सेवा समाप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वंजारी यांनी दिली.
देहण येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची गरज होती. मात्र आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिकेच्या चालकाने डिझेल नसल्याचे कारण देत सेवा देण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी भागवत यांच्या पुढाकारातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि महिलेला वेळेत दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे माता व बाळ दोघांचेही प्राण वाचले.
डॉ. वंजारी यांनी सांगितले की, रुग्णवाहिकांसाठी इंधन भरण्यासाठी बीपीसीएलचे कार्ड उपलब्ध आहे. मात्र गिम्हवणे येथील पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे डिझेल भरण्यात अडचण निर्माण झाली होती. यापूर्वीही अशाच परिस्थितीत अधिकाऱ्यांनी स्वतः खर्च करून डिझेल उपलब्ध करून दिले होते. मात्र त्याची बिले संबंधित लिपिकाने पुढील प्रक्रियेसाठी न पाठवल्याने परतावा मिळाला नाही.
या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. तालुक्यात १०८ सेवेची एक आणि १०२ सेवेच्या आठ रुग्णवाहिका कार्यरत असतानाही एका गर्भवती महिलेला सेवा नाकारली जाणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणातील चौकशीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.































































