
सायकल चालवा, इंधन बचत करा; सायकल चालवा, प्रदुषण टाळा तसेच सायकल चालवा आरोग्य जपा, असे विविध प्रकारचे जनहितांचे संदेश देत दापोली शहरातून निघालेल्या सायकल फेरीला स्वयंस्फुर्तीने सायकलस्वारांचा उस्फुर्त अशाप्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सायकलिस्ट ग्रुप दापोलीने आयोजिलेली शनिवारची सायकल फेरी यशस्वी ठरली आहे.
दापोली शहरात दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, प्रदुषणाने आपल्या शरीराबरोबरच पर्यावरणाचे होणारे नुकसान याविषयी जनमानसांमध्ये जनजागृती करत विविध प्रकारचे संदेश देत सायकलस्वारांनी दापोली शहरातून सायकल फेरी काढली. या सायकल फेरीत साधारणपणे शंभरच्या आसपास सायकलस्वार सहभागी झाले होते. सहभागींमध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने सामिल झाले होते. त्यामुळे सायकलिस्ट ग्रुपने आयोजिलेली सायकल फेरी कमालीची यशस्वी झाली आहे.
दापोली येथील सायकलीस्ट ग्रुप तर्फे शनिवारी 26 डिसेंबर रोजी दापोली शहरातून काढण्यात आलेल्या सायकल फेरीची सुरुवात दापोली शहरातील आझाद मैदान येथून सकाळी ठीक 8 वाजता झाली. मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीत गेल्या चार दिवसापासून कडाक्याची थंडी पडत आहे. तरीही लहान मुले आणि जेष्ठ नागरिक थंडीच्या हुडहुडीत सकाळीच सायकल घेऊन आझाद मैदान नजिक हजर राहिले.
त्यानंतर आयोजकांनी काही सुचना केल्या आणि ही फेरी संपूर्ण दापोली शहरातून काढण्यात आली. सायकलवर लावलेले जनहितांच्या संदेशाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पर्यावरण जपण्यासाठी सायकल कशी उपयुक्त आहे आणि आपले आरोग्य सांभाळणे कसे आपल्या हाती आहे, हा संदेश घेवून सायकलस्वारांनी दापोलीतून काढलेल्या सायकल फेरीचे ठिकठिकाणी व्यवसायिकांसह काही स्वयंसेवी संस्थाकडून स्वागत केले जात होते. त्यामुळे सायकल फेरीतील सामिल सायकलस्वारांचाही आत्मविश्वास दुणावत होता.
आझाद मैदानातून निघालेली सायकल फेरी दापोली शहरातील महत्वाच्या मार्गावरील नागरी वस्तीतून काढण्यात आली. लहान मुलांचा विचार करता उन्हाचा तडाखा होण्याआधी साधारणपणे 10 किमी अंतर कापून पुन्हा आझाद मैदानात सायकल फेरीची समाप्ती करण्यात आली. या सायकल फेरीत दापोली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेकजन सामील झाले होते.




























































