
पावसाचा हंगाम सुरू झाला असतानाही लांबलेल्या पावसाने अखेर शनिवारी पहाटेपासूनच जोरदार बरसण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज दिवसभर बरसणाऱ्या पावसाने दापोलीत सगळीकडे पाणीच पाणी केले. त्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असून एवढया दिवस रखडलेली शेतीची कामे आता चांगलीच गती घेतील.
यावर्षीचा पावसाळी हंगाम सुरू झाला असतानाही लांबलेल्या पावसाने दापोलीतील गावागावात पाणी टंचाईची समस्या गडद केली होती. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील रहीवाशांना पाण्याच्या शोधात वणवण भटकावे लागले होते. पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे रखडली होती. पेरलेल्या धानाचा धड रूजवा झाला नव्हता. काही ठिकाणी रूजवा झालेले रोप कमकुवत होते त्यामुळे अनेक ठिकाणी शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. असे असले तरी एवढया दिवसाने का होईना रखडलेल्या पावसाने आपली दमदार सुरूवात केल्याने बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे.
हवामान विभागाने 23 जून पासून पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र 23 जूनला पाऊस काही पडला नाही. शनिवारी 24 जूनच्या पहाटेपासून पावसाने बरसण्यास सुरूवात केली. डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या दापोली गिम्हवणे येथील उदयान विदया येथील प्रक्षेत्रावरील हवामान केंद्रात सकाळी 8 वाजेपर्यंत 23.8 मि.मी.अषी पावसाची नोंद झाली आहे. तर 24 जून रोजी दुपारपर्यंत याच हवामान केंद्रावर 42. 8 मि.मी.अशी पावसाची नोंद करण्यात आली आहे आतापर्यंत या हंगामात एकुण 120.8 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी या तारखेस 45.4 मि.मी.अशी पावसाची नोंद झाली होती तर गतवर्षी 24 जून 2022 पर्यंत एकुण 261.6 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली होती.
खरीप हंगाम सुरू झाला तरी मौसमी पावसाने यावर्षी दडी मारल्याने शेतीची तर कामे रखडली होतीच शिवाय गावागावातील पाण्याचे जलस्त्रौत आटल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आता बरसलेल्या पावसाने शेतकरी सुखावले असून अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या मिटणार आहे. तर एवढया दिवस उकाडयाने त्रस्त झालेले चक्क रस्त्यावर रेनकोट घालून फिरत होते. तसेच छत्र्याही हाती घेतलेले दिसत होते.



























































