
दापोली तालुक्यातील पावनळ येथे सोमवारी सुशांत परब यांचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला होता. दापोली पोलिसांनी या प्रकरणी तपास करून सुशांतचा खून त्याच्याच मित्राने केला असल्याचे उघड केले असून याप्रकरणी त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. मात्र हा खून का करण्यात आला याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 2 जानेवारी 2023 रोजी करंजाळी येथे दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास अनिल रामाणे हे शेतीचे कवळ तोडण्यासाठी पावनळ व करंजाळी सीमेलगत काटवड या ठिकाणी गेले असता त्यांना एका पुरुषाचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी ही गोष्ट पोलीस पाटील प्रकाश मोरे याना सांगितली. पोलीस पाटील प्रकाश मोरे यांनी याची माहिती दापोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर हा मृतदेह सुशांत किशोर परब याचा असल्याचे निष्पन्न झाले. दापोली पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपासास सुरुवात केल्यावर सुशांत हा त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकर वाडी येथे रहात होता. त्याचा अंधेरी (मुंबई) येथील मित्र जयकीसन ओमप्रकाश सिंग हा त्याला भेटायला रविवारी 1 जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे आला होता. रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले. त्यानंतर जयकीसन याने सुशांतचा काटा काढला. त्याचे अंगावरील सर्व कपडे काढले व ते मृतदेहापासून सुमारे 20 ते 25 फुटावर असलेल्या झाडावर अडकवून ठेवले. त्यानंतर जयकीसन सकाळी सुशांतच्या घरी आला व आजीला सांगून बाहेर पडला.
सुशांतचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. सुशांत व जयकीसन हे दोघे रात्री बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना मोबाईल कॉलच्या लोकेशवरून जयकीसन हा खेड येथे असल्याचे समजले. पोलिसांनी खेड येथील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेतले. जयकीसन याला अमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. सुशांत याचे वडील मुंबईत रहात असून आज सकाळी ते दापोलीत आल्यावर त्यांनी सुशांतचा खून झाला असल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली असून जयकीसन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.या घटनेचा अधिक तपास दापोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत.






























































