दापोलीत हापूस खरेदी करण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोलीत आलेल्या पर्यटकांचा हापूस आंबा खरेदी करण्याकडे अधिक कल दिसत असून ते चढया दरानेही हापुस आंबा खरेदी करत आहेत. त्यामुळे आंबा विक्रेत्या स्टाॅलवर आंबा खरेदी करण्यासाठीची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.

दापोली शहरातील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या सर विश्वेसरै्यया सभागृहाकडे जाण्याच्या मार्गावरील गेट समोर आंबा विक्रेत्यांचे स्टाॅल लागलेले आहेत. दापोली शहराकडून हर्णे,आंजर्ले,केळशी, कर्दे, मुरूड, बुरोंडी कोळथरे या पर्यटनदृष्टया महत्वाच्या ठिकाणाकडे जाणारा हा मार्ग आहे. येता जाता याच मार्गाचा पर्यटकांना उपयोग करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेल्या आंबा खरेदी स्टाॅलवर पर्यटक हे आंबा खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

दापोलीला दोन वेळा अवकाळी पावसाने झोडपले त्यामुळे आधीच आंब्याचे पिक धोक्यात आले आहे. त्यात काही आंबा बागायतदारांच्या बागेत किरकोळ असलेला आंबा हा मुंबई एपीएमसी वाशी मार्केटला अथवा पूणे गुलटेकडी येथील मार्केट यार्डला विक्रीसाठी पाठविण्यापेक्षा शेतकरी हे स्वतःच बसून आपल्याकडील हापूस आंब्याची विक्री करत आहेत. तसेच जे आंबा बागायतदार नाहीत ते देखील व्यापारी आंबा विक्रीचे स्टाॅल लावून बसले आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी आंब्याचे कमी पिक असल्यामुळे सध्या तरी आंबा विक्रीचे दर हे चढेच आहेत. दोन डझनाच्या पिकलेल्या परिपक्व आंब्याची पेटी पावसाच्या तोंडावर दोन ते अडीच हजार रूपयांना विकली जात आहे तर कच्चा आंबा 3 हजार रूपये प्रती शेकडा दराने विकला जात आहे. कोकणात आलेला पर्यटक हा या हंगामात आंबा खाण्यासाठीच खास येतो मात्र यावर्षी अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांच्या हातून पिक निसटला असल्याने यावर्षी बाजारात आंबा तसा विक्रीसाठी किरकोलच आहे. असे असले तरी उपलब्ध असलेला आंबा चढया दरानेही पर्यटक खरेदी करण्यासाठी आंबा स्टाॅलवर गर्दी करत आहेत.