प्रदूषित नद्यांचा आक्रोश

– डॉ. दत्ता देशकर

मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने स्थैर्य प्राप्त झाले ते नद्यांमुळे. परंतु या जीवनदायीनी नद्यांची सध्या काय अवस्था आहे? नदीला, पाण्याला आपण देवत्व भले बहाल केले आहे, मात्र प्रत्यक्षात त्याच नदीची दूरवस्था आपणच केली आहे. सर्वच नद्या सांडपाण्याच्या वाहक बनल्या आहेत. प्रदूषणाचे आगर बनल्या आहेत. या प्रदूषित नद्यांचा आक्रोश ऐकायलाही आपल्याला वेळ नाही, एवढी भयंकर स्थिती आहे.

नदी हा जलचक्राचा एक भाग होय. समुद्रातून सूर्याच्या उष्णतेमुळे निर्माण झालेली वाफ ढगांमध्ये परावर्तित होते. हे ढग हवेमुळे जमिनीकडे येतात, ते जमिनीवर पाऊस पाडतात, हा पाऊस चढावाकडून उताराकडे वाहायला लागतो आणि शेवटी ते पाणी नदीद्वारे समुदाला जाऊन मिळते. यालाच आपण जलचक्र म्हणतो. पावसाळ्यात जेव्हा वेगाने पाऊस पडतो तेव्हा ते पुराच्या स्वरूपात वेगाने वाहायला लागते व त्यामुळे नदीला पूर येतो. पूर येणे ही नदीची खरे पाहिले असता गरज असते. कारण त्याद्वारे नदी स्वच्छ होते. हा इतका साधा आणि सरळ व्यवहार आहे. ती ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशातील लोकांच्या आणि शेतीच्या गरजा भागवत भागवत ती पुढचा प्रवास करते आणि त्यामुळे मानवाच्या जीवनात नदीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.

माणूस सुरुवातीच्या अवस्थेत नदीच्या काठावर स्थिर झाला, त्याच्या जीवनाला स्थैर्य आले ते नदीमुळेच. तो शेती करू लागला आणि या अवस्थेत त्याने नदीशी भावनिक नाते निर्माण केले. तिला आदर देण्यासाठी तो तिला आई मानायला लागला, तिची पूजा करायला लागला, तिच्या काठावर मेळे भरवायला लागला. वेदांमध्ये तर नदी आणि पाणी यावर भरभरून लिखाण करण्यात आले आहे. त्यांचे ऋण व्यक्त केले आहे, त्यांची स्तुती केली आहे. थोडक्यात काय, तर नदीला आणि पाण्याला देवत्व अर्पण केले गेले आहे.

या पार्श्वभूमीवर आपण आज नदीकडे पाहिले तर काय नजरेत भरते? जवळपास सर्वच नद्या सांडपाण्याच्या वाहक बनलेल्या दिसतात. आपल्या मनातले नदीचे मोहक असे चित्र आज उरलेले दिसत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आपल्या मनातले हे चित्र पुसायला कोण कारणीभूत ठरले माहीत आहे? हे पवित्र कार्य (?) इंग्रज सरकारने केले. देशात सर्वप्रथम गावातले सांडपाणी नदीत सोडण्याचा पहिला प्रयत्न बनारस येथे करण्यात आला आणि नंतर एकामागोमाग एकेक नदी या पद्धतीने भक्ष्यस्थानी पडली. हे जाणूनबुजून केले गेले असावे. आपल्या मनात जी काही श्रद्धास्थाने होती ती भंग करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. मोगलांनीही नेमके हेच केले, पण त्यांचा मार्ग वेगळा होता. त्यांनी मंदिरांवर आघात केला. त्यांचा रोखठोक व्यवहार होता, पण इंग्रज त्या मानाने शहाणे होते. त्यांनी उघडउघड वैर न पत्करता तेच केले, जे मोगलांनी करण्याचा प्रयत्न केला. आज आपण ज्या नदीला आईची उपमा देतो, त्या नदीची आजची अवस्था बघवत नाही. आपली आई मरणशय्येवर पडली आहे आणि आपण उघडय़ा डोळ्यांनी ते बघतो आहोत.

एकदा ही गोष्ट रुळल्यानंतर आपणही नदीची ‘हत्या’ करण्याचे काम चालूच ठेवले. गावातला कचरा, राडारोडा पुठे टाकायचा? हा प्रश्न आपण सोडवून टाकला आहे. त्यासाठी नदी ही एकमेव जागा आपण शोधून काढली आहे. असे करताना आपण काही चूक करतो आहोत याची जाणीवही आता शिल्लक उरलेली नाही. हे प्रदूषण कोण कोण करतो हो?

आपण करतो. हो, आपण करतो. आपण आपली जीवन पद्धती इतकी बदलून टाकली आहे की, कळत नकळत आपण नदीचे प्रदूषण करता असतो. सकाळी उठल्याबरोबर आपण तोंड धुतो, चूळ भरून तोंडात जमा झालेली पेस्ट आपण पाण्यात टाकतो. नंतर आंघोळ करतो. त्यासाठी साबण वापरतो. त्या साबणात कितीतरी प्रकारची रसायने असतात. आपले कपडे धुतले जातात. त्यासाठी आपण पुन्हा वेगळ्या प्रकारचे साबण वापरतो. त्यातही रसायने असतात. असे दिवसभरात प्रत्येक जण जवळपास 50 ग्रॅम रसायने पाण्यात बिनदिक्कतपणे मिसळत असतो. आपल्या गावाची लोकसंख्या 20 लाख असेल तर त्याचा गुणक तेवढा बनतो. अशा प्रकारे प्रदूषित झालेले पाणी शेवटी नदीलाच जाऊन मिळते. देशाच्या पातळीवर विचार केला तर दररोज किती रसायने आपण नद्यांत मिसळत असतो याचा विचार कोणी करतो का हो? घरात निर्माण झालेले सांडपाणी यासाठी कारणीभूत ठरते. या सांडपाण्याची विल्हेवाट खरे पाहिले तर का@लनी का@लनीतच व्हावयास हवी, पण ते सर्व एकत्र करून त्यावर काहीतरी जुजबी प्रक्रिया करून ते गंगार्पण केले जाते. यासाठी खरे गुन्हेगार आपण आहोत हेही आपल्या लक्षात येत नाही.

शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या नादात शेतकरी समाज मोठय़ा प्रमाणात खते आणि रसायने यांचा वापर करतो. त्याची अशी समजूत असते की, जितके जास्त खत टाकले, तितके उत्पादन जास्त येते. या नादात खतांची मात्रा वाढते आणि त्यामुळे जलप्रदूषणही वाढीस लागते. ‘‘मला जास्त उत्पन्न मिळते ना! मग जगाचे काही झाले तरी मला त्याची पर्वा नाही’’ अशी भावना दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कारखानदारही नदी प्रदूषणात आपला हातभार लावत असतात. उत्पादन प्रक्रियेत कच्च्या मालाचे अंश, धातूचे अंश, रसायनांचे अंश पाण्यात मिसळले जातात आणि जलप्रदूषण वाढीस लागते. घरगुती वापरापेक्षा शेती, शेतीपेक्षा कारखानदार या प्रदूषणासाठी जास्त जबाबदार असतात. शेवटी कोणी कोणाला बोल लावायचा? देशातील प्रत्येक माणूस कमी जास्त प्रमाणात हे प्रदूषण करतच असतो.

प्रत्येक राज्यात सरकारने प्रदूषण नियंत्रण मंडळे स्थापन केली आहेत. असे प्रदूषण होऊ नये यासाठी ही यंत्रणा उभारली गेली आहे. पण त्याचा उपयोग किती हा संशोधनाचा विषय आहे.  त्याचा परिणाम समाजावर काय होतो याचे देणेघेणे या लोकांना नसते. एखाद्या उद्योगपतीला प्रदूषण केल्यामुळे मोठी शिक्षा झाली याचे एखादे उदाहरण तुम्ही देऊ शकाल का हो? बऱ्याचदा तर कारखाने हे राजकारण्यांचेच असतात. उदाहरण साखर कारखान्यांचे देता येईल. सिनेमातील एक गाणे मला आठवते. नाव चालवणाऱ्यानेच जर नाव बुडवली तर दोष कोणाला द्यायचा? काwटिल्याने सांगितलेले एक वाक्य मला फार मोलाचे वाटते. ‘दंडे शास्ती प्रजः, दंड एवाभि रक्षति’ असे ते वाक्य आहे. तो दंड जोपर्यंत वापरला जात नाही तोपर्यंत असेच चालणार.

मग सामान्य माणसाने काय करायचे? उघडय़ा डोळ्यांनी पाहत बसायचे. नाही, आपणही याबाबत काहीतरी करायलाच पाहिजे. नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. मग याबाबत आपण काय करणार?

(1) पहिला संदेश म्हणजे ‘मी स्वतः प्रदूषण करणार नाही’. काही शास्त्रज्ञांनी पर्यावरणीय जीवन पद्धती पुरस्पृत केली आहे. मी जर त्या जीवन पद्धतीचे पालन केले तर माझ्याकडून प्रदूषणाला आळा घालता येऊ शकेल. मिठाने, राखुंडीने किंवा कोळशाने तोंड धुणे, पर्यावरणपूरक साबण वापरणे, धार्मिक विधी करताना प्रदूषण टाळणे यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून आपण प्रदूषणावर मात करू शकतो. एकदा सुरू करण्याची देर आहे. नंतर ते आपल्या अंगवळणी पडून जाईल आणि आपण पर्यावरणीय पद्धतीचा अंगीकार करू शपू.

(2) आपण लोकशाहीत जगतो आहोत. जनमानसाचा दबाव पडला तर हुपूमशहाही झुकतात हे जगाने पाहिले आहे. सरकारी यंत्रणेवर दबाव टाकण्यासाठी समाजात आपण दबाव गट तयार केले पाहिजेत. सरकारी अधिकारी, कारखानदार प्रदूषणास मदत करत असतील तर हे दबाव गट निश्चितच योग्य दबावाचे तंत्र वापरून त्यांना वठणीवर आणू शकतात.

(3) आज नदी असलेल्या बऱ्याच शहरांत जीवित नदी चळवळ सुरू झाली आहे. आठवडय़ातून एकदा नागरिक एकत्र जमतात, नदी स्वच्छ करतात, नदीकाठावर उत्सव साजरे करतात, नदीकाठावर स्नेहसंमेलने आयोजित करतात. सरकारने किंवा नगरपालिकेने चुकीची पावले उचलली तर आंदोलने करतात. पुणे शहरात तर या चळवळीने बरेच बाळसे धरले आहे. निव्वळ नदीतील कचरा काढणे एवढय़ापुरतीच ही चळवळ सीमित राहिली नाही तर नदीशी निगडित कोणतीही चुकीचा गोष्ट घडत असेल तर ती समाजाच्या, नगरपालिकेच्या वा सरकारच्या निदर्शनाला आणून देणे हे काम या कार्यकर्त्यांकडून केले जाते.

(4) नदी आणि आपल्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे, ती कमी करता येणार नाही का? हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. पुणे शहरातील एखाद्या नागरिकाला तुमच्या गावातून किती नद्या वाहतात? हा प्रश्न विचारला तर तो बरोबर उत्तर देईल याची आपल्याला खात्री आहे का? असे होण्याचे कारण म्हणजे आपण नदीपासून दुरावले आहोत. पहिले पाऊल म्हणून नगरपालिकेने प्रत्येक नदीवर जो पूल बांधला आहे त्याच्या काठावर नदीचे नाव, नदीची लांबी, तिचे उगमस्थान यासंबंधी एखादा मोठा बोर्ड लावला तर येणारा जाणारा तो बोर्ड वाचेल आणि नदीशी मैत्री करायला सुरुवात करेल.

(5) मी माझेच उदाहरण देतो. मी एक ‘जलसंवाद’ नावाचे मासिक चालवतो. दर महिन्याच्या प्रत्येक अंकात देशातील आणि परदेशातील एका नदीचा मी या मासिकात वाचकांना परिचय करून देत आहे. वाहत्या प्रवाहाचा पह्टोही दिलेला असतो. वाचकांच्या पत्रव्यवहारात मला बऱ्याच वाचकांची पत्रे येतात आणि या स्तुत्य उपक्रमाचे काwतुक करतात. हा माझा या क्षेत्रातील खारीचा वाटा आहे असे मी समजतो. नदीशी आपण वार्तालाप केला तर नदी निश्चितच आपल्याला म्हणेल, ‘‘बाबा रे, मला माझ्या पद्धतीने वाहू दे. मी तर तुला सदैव मदतच करत असते ना. मग एवढे ऐकशील माझे?’’ आजचा नदी दिन (‘नदी दीन’ नव्हे!) आपण आनंदाने साजरा करूया हेच माझे आपल्या सर्वांना याप्रसंगी सांगणे आहे.

प्रदूषित नद्यांचे दुष्परिणाम

z   हे प्रदूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्याचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो. शरीराची कार्यक्षमता त्यामुळे लयाला जाते. नवनवीन विकार या प्रदूषित पाण्यामुळे निर्माण होतात. रोगांच्या साथी वेगाने पसरतात. असे बरेच विकार आहेत, जे आजपर्यंत आपल्याला माहीतही नव्हते. त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी औषधांवरचा खर्च वाढतो.

z   पेयजल प्रदूषित असल्यामुळे आजकाल बाटलीबंद पाण्याचे प्रस्थ वाढत चालले आहे. ते पाणी शुद्ध असते याची आपण शंभर टक्के खात्री देऊ शकतो का हो? मुळीच नाही. आपण शुद्ध पाणी पित आहोत असे खोटे समाधान मात्र त्यामुळे मिळते ती गोष्ट वेगळी.

z  नदी ज्या प्रदेशातून वाहत असते तिथे नदीचे पाणी हे जमिनीत मुरते. हे प्रदूषित पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूजलही प्रदूषित होते. भूपृष्ठावरील पाणी शुद्ध केले जाऊ शकते, पण भूजल शुद्ध करणे केवळ अशक्य असते. यामुळे केवढे मोठे नुकसान होत असते याची कल्पनाच केलेली बरी.

z  नदीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. त्या पाण्यातील प्रदूषणाचा शेतीत तयार होणाऱ्या शेतमालावरही परिणाम होत असतो. असे अन्न पोटात गेल्यामुळे विकारांची संख्या बळावते.

(लेखक जल अभ्यासक आहेत)

z [email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या