मुंबईसह राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री दत्त जयंती जन्मोत्सव उद्या, बुधवार, 7 डिसेंबरला साजरा केला जाणार असून मुंबईसह राज्यभरात हा उत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. माटुंगा येथील टायकलवाडी, मलबार येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आश्रम, नवी मुंबईतील जुईनगर तसेच महाडमध्ये दत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

माटुंगा येथे धार्मिक कार्यक्रम
मुंबई – सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री स्वामीभक्त सुनील देऊलकर यांच्या निवासस्थानी पारिजात बिल्डिंग, टायकलवाडी, माटुंगा पश्चिम येथे बुधवार, 7 डिसेंबरला संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत दत्त जयंती उत्सव होणार आहे. अभिषेक, सहस्रनामावली, श्री सत्यनारायण महापूजा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील देऊलकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नवी मुंबईत दत्त जन्मोत्सव
मुंबई – श्री अविनाश महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने नवी मुंबईतील जुईनगर, सेक्टर 23, ओम साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये बुधवार, 7 डिसेंबरला श्री दत्तजयंती जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळा अभिषेक पूजा, दत्त महायाग, दत्त जन्मोत्सव, महाआरती, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक आणि रहिवाशांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

परळमध्ये गुरुचरित्र वाचन
परळमधील ओम ईश्वटेश्वर क्रीडा मंडळाच्यावतीने बुधवार, 7 डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सव आणि सत्यनारायणाची महापूजा करण्यात येणार आहे. यावेळी मंडळाच्यावतीने 52 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 7 ते शनिवार, 10 डिसेंबरपर्यंत आरती, गुरुचरित्र वाचन, दत्त महाराजांची पालखी मिरवणूक, श्री शिवचरित्र व्याख्यान यासारख्या धार्मिक कार्यक्रमांसह महिला, मुले यांच्यासाठी हळदीकुंकू, प्रश्नमंजूषा, केशभूषा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, जीवनगौरव पुरस्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती सरचिटणीस निलेश सावंत यांनी दिली.

विलेपार्लेतील स्वामी मठात पालखी सोहळा
मुंबई – विलेपार्ले येथील श्री स्वामी समर्थ मठात मोठय़ा उत्साहात दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता दत्तजन्म झाल्यावर स्वामी महाराजांची आरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात आणि लेझीमच्या तालात स्वामी समर्थांची पालखी हनुमान रोड येथून प्रस्थान करत दत्त मंदिर, संत जनाबाई रोड, महालक्ष्मी मंदिर, पार्लेश्वर मंदिर करून रात्री 10 वाजता मठात येईल. यंदाचे मठाचे 22 वे वर्ष आहे. तरी सर्व भक्तांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावावी, असे आवाहन स्वामी समर्थ मठाच्यावतीने तसेच विश्वस्तांनी करण्यात आले आहे.

मलबार हिलमध्ये होमहवन
मुंबई – परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बुधवार, 7 डिसेंबरला मलबार हिल, सिरी रोड येथील नाथ गगनगिरी मलबार हिल आश्रम येथे दत्तजयंती उत्सव होणार आहे. या उत्सवातंर्गत सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान कमला नेहरू पार्क, गेट क्र. 2 आणि 3 येथे रक्तदान शिबीर होणार आहे. तर दुपारी 12 ते संध्याकाळी 7 या वेळेत होमहमन, भंडारा, दत्त पालखी आणि दत्तजन्म असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

महाडमध्ये नामस्मरण
मुंबई – श्री अनसुयानंदन दत्त मंदिर ट्रस्ट आणि वरंडोली-वरेकोंड) ग्रामस्थांच्या सौजन्याने सुभाष बाळू मोरे (मोरेबाबा) यांच्या आशीर्वादाने बुधवार, 7 डिसेंबरला महाड वरडोली गावाच्या दत्त मंदिरात साजरा केला जाणार आहे. गुरुवारपर्यंत चालणाऱया सोहळय़ात नामस्मरण, जप, होमहवन, भजन, कीर्तन, हरिपाठ, आरती, श्री दत्तमूर्तीवर अभिषेक, पालखी सोहळा आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.