आधी मुलीचे कन्यादान, मग आईने घेतली सप्तपदी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकाच मांडवात दोन भावांचे किंवा दोन बहिणींचे लग्न झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो. पण मुलीच्या लग्नात आईनेदेखील लग्न उरकल्याची दुर्मिळ घटना नुकतीच घडली आहे. गोरखपूर आयोजित सामूहिक लग्न सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. या सामूहिक लग्न सोहळ्यात सुमारे 63 जोडप्यांचे लग्न झाले. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती बेला देवी आणि इंदू या आई-मुलीच्या लग्नाची.

बेला देवी यांनी आधी आपल्या मुलीचे कन्यादान केले मग स्वतः देखील सप्तपदी घेतली. बेला देवी यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी एकटीनेच आपल्या दोन मुले आणि तीन मुलींचा सांभाळ केला.

आपल्या सर्वात धाकटय़ा मुलीचे म्हणजे इंदूचे लग्न लावून दिल्यानंतर बेला देवी एकटय़ाच पडणार होत्या. त्यामुळे त्यांनी पुढील आयुष्यासाठी जोडीदार म्हणून 55 वर्षीय अविवाहीत दीर जगदीश यांची निवड केली. या अनोख्या लग्नाची आता सगळीकडे चर्चा आहे.