मोदींच्या वापसीमुळे दाऊद टरकला, ‘आयएसआय’कडे मागितली सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत यशामुळे आंतरराष्ट्रीय माफिया डॉन दाऊद इब्राहिम कासकर चांगलाच टरकला आहे. मोदींमुळे आता आपली खैर नाही असे वाटून त्याने पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’कडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

मुंबई बॉम्बस्फोट घडवल्यापासून दाऊद इब्राहिम हिंदुस्थानच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे तो पाकिस्तानात दडून बसलेला आहे. मोदींनी थेट पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राईक केल्यापासून तर दाऊद हादरलेलाच आहे. त्यात लोकसभेची निवडणूक लागली तेव्हा मात्र त्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की मोदी सरकार आले नाही तर पुन्हा आपल्या धंद्यात जम बसवता येईल. परंतु मोदींना 2014 पेक्षा यावेळी अधिकच यश मिळाल्यामुळे दाऊदच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. धंद्याचे तर राहिले बाजूला, आता त्याला आपल्या सुरक्षेचीच अधिक काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे त्याने पाकिस्तानी आयएसआयच्या बडय़ा अधिकाऱयांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांच्याशी हिंदुस्थानातील नव्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली. मोदी पुन्हा आल्यामुळे आता हिंदुस्थानचे अमेरिका आणि इस्रायलशी अधिक चांगले संबंध वाढतील. तसेच आपल्या जिवालाही अधिक धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याने या अधिकाऱयांकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.