
साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठsचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला. यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक, भाषातज्ञ डॉ. गणेश देवी आणि मानवी हक्क कार्यकर्ता, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांची निवड झाली आहे. तसेच ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रपर पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. येत्या 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कवी-अभिनेता अक्षय शिंपी यांचे कथाकथन आणि ‘झुंड’फेम विपीन तातड आणि रॅप कलावंत माही जी यांचे सादरीकरण होईल, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली.



























































