
आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी महाराष्ट्राकडून झालेला सन्मान माझ्यासाठी मोलाचा आहे. ही शाबासकीची थाप असून त्यामुळे मला मातृभूमीची सेवा करण्यासाठी अधिक चैतन्य मिळेल, असे प्रतिपादन अल अदिल समूहाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.
‘दुबई एक्स्पो 2020’ या जागतिक प्रदर्शनानिमित्त आयोजित ‘डॅझलिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमात डॉ. दातार यांना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी डॉ. दातार बोलत होते. महाराष्ट्राच्या उद्योग तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, हिंदुस्थानचे दुबईतील महावाणिज्य दूत (कॉन्सूल जनरल) डॉ. अमन पुरी यांच्यासह उद्योग-व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.






























































