Superman ‘गे’ होणार, सुपरहिरोंची नवी पिढी समलिंगी दाखवण्यासाठी कॉमिक्स विश्वात चढाओढ

दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आलेला, पोलादी छातीचा, विराट शक्ती असलेला मात्र मानवी मनाचा सुपरमॅन हा जगभरातील कोट्यवधी लोकांच्या पसंतीचं पात्र आहे. सुपरमॅन आणि स्पायडरमॅन ही दोन पात्र माहिती नाही अशी माणसं जगभरात बोटावर मोजता येतील इतकीच असतील. सुपरमॅन हा एका अर्थाने तुमच्या आमच्यासारखा सामान्य दाखवण्यात आला होता, जो वेळ पडल्यानंतर सुपरमॅनचं रुप घेत असतो. सुपरमॅनचं प्रेम हे लुईस लेन असल्याचं आजपर्यंतच्या सगळ्या कॉमिक्स बुकमध्ये, मालिकांमध्ये तसेच चित्रपटामध्येही दाखवण्यात आलं आहे. नव्या जमान्यात त्याच्या या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न डीसी कॉमिक्सने करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुपरमॅन सन ऑफ काल-एल नावाची नवी मालिका जुलै महिन्यापासून डीसी कॉमिक्सने सुरू केली आहे. यामध्ये जॉनाथन केंट हा क्लार्क केंट(सुपरमॅन) आणि लुईस लेन यांचा मुलगा दाखवण्यात आला आहे. जॉन (जॉनाथनचा लघू उच्चार) हा स्ट्रेट (महिलांप्रती आकर्षण असलेला पुरुष) दाखवण्यात आला नसून तो ‘गे’ म्हणजेच समलिंगी दाखवण्यात आला आहे. जॉन हा ‘गे’ दाखवण्यात येणार असल्याची घोषणा डीसी कॉमिक्सने सोमवारी केली. सुपरमॅन बनलेल्या जॉन त्याच्या मित्राचे चुंबन घेत असतानाचा फोटो डीसी कॉमिक्स आणि टेलर यांनी यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे. टॉम टेलर नावाचा लेखक सुपरमॅनची नवी मालिका लिहीत असून त्याने एका मुलाखतीत सांगितलं की नवा सुपरमॅन हा नव्या आव्हानांशी मुकाबला करत आहे, ज्यात वास्तविक समस्यांचाही समावेश आहे.

डीसी कॉमिक्सनेही नव्या सुपरमॅनचे दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबत जी माहिती देण्यात आली आहे, त्यामध्ये नव्या सुपरमॅनच्या मित्राचं नाव जे नाकामुरा (Jay Nakamura) असल्याचं सांगण्यात आलं आहे. क्लार्क केंट हा पत्रकार असलेल्या लुईस लेनच्या प्रेमात पडलेला दाखवण्यात आला आहे तसाच त्याचा मुलगा जॉन केंट हा पत्रकारच असलेल्या जे नाकामुराच्या प्रेमात पडलेला दाखवण्यात आला आहे.

जॉन केंट हा एकटा सुपरहिरो नाहीये जो गे दाखवण्यात आला आहे. डीसी कॉमिक्सने बॅटमॅन -अर्बन लेजंडसमध्ये (Batman: Urban Legends #6) बॅटमॅनचा साथीदार रॉबिन हा एका तरुणाच्या प्रेमात पडलेला दाखवण्यात आला आहे. या मालिकेत रॉबिन हा बायसेक्शुअल दाखवण्यात आला होता. यंग जस्टीस-आऊटसायडर्स (Young Justice: Outsiders) मध्ये अ‍ॅक्वामॅन हा कृष्णवर्णीय असून तो देखील ‘गे’ असल्याचे दाखवण्यात आले होते. मार्व्हल कॉमिक्सनेही त्यांची काही पात्र समलिंगी असल्याचं सांगितलं होतं. 2019 साली CNN ने दिलेल्या बातमीत म्हटलं होतं की आगामी चित्रपत थॉर लव्ह अँड थंडर (Thor: Love and Thunder) मध्ये थॉरची साथीदार व्हॅल्करी ही लेस्बिअन असल्याचं दाखवण्यात येणार आहे. मार्व्हलने त्यांचा सर्वात पहिला समलिंगी सुपरहिरो ‘नॉर्थस्टार’ असल्याचं सांगितलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या