
सर्जेकोट व तळाशील येथील मच्छीमार व ग्रामस्थांनी उसळणार्या लाटात बचाव मोहिमेद्वारे दुर्घटनाग्रस्त कार्तिकी व मोरया या दोन्ही नौका सर्जेकोटसमोरील तळाशील किनार्यावर आणल्या आहेत. मात्र नौकेतील मासेमारी जाळी वाहून गेली. यात मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या दिवाकर देऊलकर (26) याचा मृतदेह रविवार, 19 जुलै रोजी सकाळी तोंडवळी किनारपट्टीवर सापडला.
शनिवारी सकाळी सर्जेकोट खाडी पात्रात मासेमारीस गेलेली नौका पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन समुद्राच्या मुखाजवळ (संगम) बुडाली. दुर्घटनेत नौकेतील चार मच्छीमार पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचवण्यास गेलेली दुसरी नौकाही लाटांच्या तडाख्यात बुडाली होती. दोन्ही नौकेवरील आठ ते दहा मच्छीमारांनी तासभर पोहत किनारा गाठला. या अपघातात दिवाकर देऊलकर (26) हा सर्जेकोटला राहणारा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला होता. दिवसभर शोधकार्य सुरू होते. अखेर रविवारी सकाळी तोंडकळी-तळाशील समुद्रकिनारी दिवाकरचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात दिवाकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अविवाहित असलेल्या दिवाकर यांच्या पश्चात आई, दोन भाऊ व अन्य नातेवाईक असा परिवार आहे.
जुळे भाऊ…
दिवाकरचा मित्रपरिवार मोठा होता. दिवाकरला यशवंत हा जुळा भाऊ होता तर रमेश हा लहान भाऊ होत. त्यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्की निधन झाले होते. मासेमारी हा उदर्निवाहाचा व्यवसाय आहे. शनिवारी मासेमारीस गेलेला दिवाकर समुद्रात बुडल्याची माहिती मिळताच यशवंत अन्य मच्छीमार बांधवांसोबत दिवाकर व अन्य बुडालेल्या मच्छीमारांना वाचवण्यास गेला. मात्र दिवाकर सापडला नाही. रविकारी त्याचा मृतदेह सापडला.
वुड हाऊसचे नुकसान
वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणार्या सागरेश्वर किनारी या ‘वुड हाऊस’ प्रकल्पाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गेले दोन वर्षे सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या प्रकल्पासाठी समुद्रकिनार्यावर उभारलेला वुड हाऊसचा पाया ढासळण्यास सुरुवात झाली होती. समुद्राच्या लाटांचा जोर वाढल्यामुळे आज पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस खचले असून वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.
























































