
देशभरात सुरू असलेल्या कोरोना कहराचे विदारक चित्र रोज समोर येत आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह आढळल्यानंतर आता मध्य प्रदेशात रूंज नदीत प्रेतं तरंगताना आढळली. यामुळे एकच खळबळ उडाली असून, कोरोनाचा आणखी उद्रेक वाढण्याची भीती आहे.
पन्ना जिह्यातील नंदनपूर गावाजवळ रूंज नदीच्या किनाऱयावर सहा मृतदेह आढळले. किमान सहा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून, दुर्गंध सुटल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस हजर झाले. नदीत आणखी मृतदेह असण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशात कोरोना संसर्ग वाढला असून, मृतांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी विलंब लागत आहे. लाकडांचीही टंचाई आहे. त्यामुळे मृतदेह नदीच्या पाण्यात सोडून दिले असावेत आणि ते वाहत नंदनपूर गावाजवळ किनाऱयावर आले असावेत, अशी शक्यता आहे. यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याची भीती आहे.
गंगेत आणखी 7 मृतदेह आढळले
उत्तर प्रदेशात गंगानदीत मृतदेह आढळण्याचे सत्र सुरूच आहे. गाझीपूर पाठोपाठ आता बलियामध्ये बुधवारी सात मृतदेह सापडले. त्यामुळे गंगा नदीत आतापर्यंत मृतदेह आढळण्याची संख्या 52 वर गेली आहे. बलिया-बक्सर दरम्यान हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. कोठून हे मृतदेह आले याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आदिती सिंह यांनी दिली.






















































