मटण खवय्यांची फसवणूक, वाड्यात मेलेल्या मेंढ्यांचे मटण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसे कमवण्यासाठी खवय्यांच्या जिवाशी कसा खेळ सुरू आहे, हे आज वाड्यात उघडकीस आले. येथील कत्तलखान्यामध्ये मोठय़ा प्रमाणात मृत, मरतुकडय़ा मेंढ्या, शेळ्या कत्तलीसाठी येत असून त्याचे मटण अनेक हॉटेल, ढाबे आणि पालघरवासीयांच्या ताटात पडत असल्याचा पर्दाफाश वाडा पोलिसांनी केला आहे. कत्तलखान्यांमध्ये मृत शेळ्या, मेंढय़ा घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी सापळा रचून जप्त केल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. या कारवाईने मृत व मरतुकडय़ा शेळ्या-मेंढय़ा कत्तलखान्यात पोहोचविणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील कत्तलखान्यांमध्ये मृत, मरतुकडय़ा शेळ्या, मेंढय़ांचा पुरवठा करणारे रॅकेट सक्रिय असल्याची खबर वाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे खंडेश्वरी नाका येथे पोलीस उपनिरीक्षक डोरकर व पोलीस हवालदार सतीश शेळवले, संजय दराडे गस्त घालत असताना त्यांना नाशिक, मालेगाव येथून दोन ट्रक संशयितरित्या येत असताना आढळले. ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये 103 शेळ्या-मेंढय़ा आढळल्या. यातील 35 शेळ्या-मेंढय़ा मृत तर उर्वरित मरणासन्न अवस्थेत आढळल्याने चालक व चारजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी या मृत शेळ्या-मेंढय़ा पालघरच्या कत्तलखान्यांमध्ये घेऊन जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

ढाबे, हॉटेलमध्ये ताव मारताना जरा जपून…
मटण विकत घेताना बोकड कधी कापला, मटण ताजे आहे की नाही हे चोखंदळ खवय्ये तपासून घेतात. मात्र हॉटेल आणि ढाबेवाले शिळे मटण स्वस्तात मिळते म्हणून विकत घेतात. खरे तर छोटय़ामोठय़ा ढाबे, हॉटेलमध्ये अशाच मटणाला मागणी असते. त्यामुळे पालघरमध्ये परजिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मृत जनावरे आयात होत असून त्याचे मटण ‘चमचमीत’ करून खवय्यांच्या ‘थाळी’त वाढले जाते. त्यामुळे हॉटेलमध्ये मटणाची थाळी मागवताना खवय्यांनो सावधान असेच म्हणण्याची वेळ आली आहे.