
ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात शनिवारी पहाटे एका सरकारी बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, ओडिसा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची (OSRTC) बस भवानीपटना येथून विशाखापट्टणमच्या दिशेने जात असताना पहाटे २ च्या सुमारास पोट्टांगी ब्लॉकमधील सुंकी घाटात हा अपघात घडला. पानसमनगुडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग-२६ वरील एका तीव्र वळणावर बसचे नियंत्रण सुटले आणि ती सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळून उलटली.
अपघाताची माहिती देताना सुंकी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक चतुर्भुज नायक यांनी सांगितले की, गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या एका प्रवाशाचा पोट्टांगी येथील आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी चार जणांना कोरापुट मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे, तर दोघांना विशाखापट्टणम येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. बसमधील प्रवासी भागीरथी बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


























































