
गेल्या काही दिवसांपासून गरमीने त्रासलेल्या मुंबईकरांनी बुधवारी पडलेल्या अनपेक्षित पावसाने दिलासा दिला. मात्र एकाएकी सलग 24 तास पाऊस पडल्याने मुंबईचे तापमान चांगलेच खाली उतरले असून मुंबईकरांना सोमवार रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. गेल्या 24 तासात तापमानात तब्बल 9 अंशानी घट झाली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी पाऊस थांबल्यानंतर मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला.
मुंबईत मंगळवारी 33.3 डिग्री सेल्सियस तापमान सांताक्रूझ व कुलाबा वेधशाळेने नोंदवले होते. पावसानंतर त्या तापमानात 9 अंशांनी घट झाली व बुधवारी रात्री मुंबईचे तापमान 23.8 डिग्री सेल्सियस पर्यंत खाली पोहोचले होते. सांताक्रूझ वेधशाळेने कमीत कमीत 23.8 तापमान नोंदवलं होतं. तर कुलाबा वेधशाळेने 24.5 तापमान नोंदवलेले.
मुंबईसह कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात 3 डिसेंबरपर्यंत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह हा पाऊस राहणार असून हवामान खात्याने मुंबई, ठाण्याला ‘यलो अॅलर्ट’ जारी केला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने निघालेले चक्रीवादळ वायव्येला सरकल्याने अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील हवामान बदलले आहे. तिथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पाऊस होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे, अशी माहिती हवामान विभागातील ज्येष्ठ हवामानतज्ञ के. एस. होशाळीकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रात वाऱयाचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा येथील किनारपट्टीवर वादळी हवामान निर्माण होऊन ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.




























































