शिवजयंती, सभागृह, खुल्या मैदानांतील कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सभागृह आणि खुल्या मैदानांतील कार्यक्रमांना 200 पेक्षा अधिक व्यक्तींच्या उपस्थितीसाठी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रमांना परवानगीबाबतही शासनस्तरावर चर्चा केली जाईल. याबाबत निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, 50 टक्के उपस्थिती ठेवून थिएटर सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. इतर कार्यक्रमांना बंधने आहेत. लग्न समारंभांना बंधने आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची क्षमता असेल तर एक हजार लोकांना परवानगी नाही. फक्त दोनशे लोकांनाच परवानगी आहे. त्यामुळे त्यात शिथिलता आणण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा आढावा घेऊन हळूहळू निर्बंध शिथिल केले जातील. मात्र जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागतील. कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. कोवॅक्सिन लसीचा पुरवठा होण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

जम्बो कोविड सेंटरमध्ये चुकीचे काम नाही

भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावर पवार म्हणाले, या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता. जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार, जिल्हा वार्षिक योजना, पालिकेचा हिस्सा असतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ आदींचा या कामात सहभाग होता. आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या कोविड सेंटरमध्ये काही चुकीचे काम झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.