
सामना प्रतिनिधी । वाढवणा
वाढवणा व परिसरातील गावात खरीप हंगामातील तूर पिकाचे पावसाअभावी खराटे झाले आहे. वाढवणा हे उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन ८० टक्के शेती ही पावसाळ्याच्या पावसावरच अवलंबुन आहे. तुरीला वेळेवर पाणी नसल्यामुळे झाडांना लागलेले फुल जाग्यावरच झडुन गेल्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आले आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणा गाव व परिसर दुष्काळ म्हणून शासनाच्या यादीत नाव नाही म्हणून शेतकरी जिल्हा प्रशासनावर नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाढवणा परिसर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
गावातील व परिसरातील शेतकरी वर्षभर शेतात कष्ट करून उसने पासने पैसे घेऊन बी – बियाणे घेऊन खरीप हंगामातील उडीद, मुग, ज्वारी, सोयाबीन, तूर पिकाची लागवड केली. पीक चांगले आले मोठे झाले मात्र पावसाने दडी दिल्याने उडीद, मुग तर हातचे गेले सोयाबीन थोडे फार झाले. बी – बियाणांना घातलेला खर्च हि निघाला नाही. शेतकऱ्याची तुरीवर दारोमदार होते. उसने पासने करून घेतलेल्या बी – बियाण्याचे पैसे फिटतील व थोडे फार राहिलेले पैसे संसाराचा गाडा चालवण्यासाठी होतील, अशी आशा करून शेतकरी दिवस काढत होता. मात्र ऐन फुलात आलेल्या तुरीच्या झाडाला वेळेवर पाऊस पडला नसल्याने फुल जागेवरच झडुन पडले. फक्त राहिले तूराट्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आता फक्त लक्ष शासनाकडे होते शासन दुष्काळ जाहीर करेल, थोडे बहुत आर्थिक मदत मिळेल या आशेत होते. परंतु तालुका जिल्हा प्रशासनाने वाढवणा परिसराला गाळल्यामुळे दुष्काळ यादीत वाढवणा गावाचे नाव यादीत आले नसल्याने शेतकरी प्रशासनावर तीव्र नाराज झाले आहेत. पुनर्तपासणी करून वाढवणा गावाचे नाव शासनाच्या यादीत घालुन दुष्काळ जाहीर करावा व आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पीक विमा द्यावा अशी एक मुखी मागणी शेतकरी करत आहेत.




























































