दीपिका पदुकोण सांगणार  अॅसिड हल्ला पीडितेची व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ऍसिडहल्ला झालेल्या युवतीचे आयुष्य आपल्यासमोर घेऊन येणार आहे, अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिका या चित्रपटात केवळ अभिनय करणार नाही, तर ती स्वतः निर्मिती करणार आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखाली हा वास्तववादी चित्रपट तयार होईल. दिल्ली येथे 2005 साली लक्ष्मी अग्रवाल या युवतीवर ऍसिड हल्ला झाला होता. बसस्टॉपवर उभ्या असलेल्या लक्ष्मीवर तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीने ऍसिड फेकले होते. त्यानंतर लक्ष्मीचे जीवनच बदलून गेले. ऍसिड हल्ल्याच्या घटनेनंतर दहा वर्षांनी लक्ष्मीचे आयुष्य पडद्यावर बघायला मिळेल. 2013 साली ऍसिड हल्लाविरोधी कायद्यात बदल झाला. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेभोवती हा चित्रपट फिरतो. चित्रपटाच्या निर्मितीबद्दल दीपिका सांगते, मी जेव्हा कथानक ऐकले. तेव्हा अक्षरशः हादरून गेले. ही फक्त हिंसेची कथा नाही तर  धाडस, कणखरता, आशा आणि विजयाची कथा आहे. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. व्यक्तिशः काहीतरी करावे असे मला वाटू लागले. म्हणूनच मी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

ऍसिड हल्ल्यातील पीडित महिलांचे प्रश्न खूप आहेत. त्यांचे वैद्यकीय उपचार, नुकसानभरपाई, पुनर्वसन या गोष्टी खूप आव्हानात्मक आहेत. लक्ष्मीची कथा सांगून  हे सर्व मुद्दे समाजासमोर आणायचे आहेत. अनेक बाबतीत जनजागृती आवश्यक आहे. आव्हानांशी सामना करायचा असेल तर समाजात जागृती व्हायला पाहिजे, अशा भावना चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी व्यक्त केल्या.