डोंगरची काळी मैना होतेय दुर्मिळ, वाढत्या जंगलतोडीचा परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औद्योगिकीकरणात दिवसेंदिवस होणारी वाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा निसर्गावर विपरित परिणाम जाणवू लागला आहे. त्यातच डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंद दुर्मिळ होऊ लागली आहेत. कोकण प्रदेश म्हटला की, डोंगर दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध प्रदेश. येथे असलेली विविध जातीची झाडेझुडपे, डोंगर, दऱ्या यामुळे कोकण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलं आहे. कोकणातील डोंगर भागात विविध रानमेव्यासह आढळणारी काळी मैना ही फार प्रसिद्ध आहे.

करवंद आणि इतर रानमेवा मोठ्या प्रमाणात या हंगामात दिसू लागतो, मात्र प्रचंड वृक्षतोड डोंगरांना लावले जाणारे वणवे तसेच डोंगर उत्खननामुळे करवंदाच्या जाळ्या दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे बाजारात करवंदाची विक्री फारच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे. करवंदाच्या जाळीला फुले येऊ लागली की, या फुलांच्या सुवासाने या छोट्याशा नाजूक फळाच्या हंगामाची जाणीव होते.

पिकलेल्या करवंदाची विक्री केल्यामुळे ग्रामीण भागातील, आदिवासी समाजातील महिला डोंगरावर फिरून करवंदाच्या जाळीतील करवंद गोळा करायच्या. यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध व्हायचा, मात्र सध्या होणारी वाढती वृक्षतोड, सतत लागणारे वणवे, औद्योगिकीकरणामुळे होणारी बेसुमार जंगलतोड यामुळे डोंगरची मैना दुर्मिळ होऊ लागली आहे. बाहेर काळ्या रंगाच्या आणि आतून लाल, हिरवा गर असलेल्या या छोट्याशा नाजूक फळाचे जंगलातील नैसर्गिक उत्पादन घटले आहे. करवंदांप्रमाणेच याचा परिणाम इतरही आरोग्य संपन्न रानमेव्यावर झाला आहे. रानात मिळणारी इतरही वेगवेगळ्या प्रकारची फळे दुर्मिळ झाली आहेत.