
सामना ऑनलाईन । डेहराडून
डेहराडून येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकासह चार विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनीला दिवस गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास शाळेतून काढून टाकू अशी धमकी मुख्याध्यापकांनी तिला दिली होती. यामुळे ती इतके दिवस हा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. दरम्यान, याप्रकरणी मुख्याध्यापकासह ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना ऑगस्टमध्ये घडली असून बदनामी टाळण्यासाठी शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपल्याचे सांगितले जात आहे. पीडिता मूळची हरयाणाची असून ती व तिची बहीण येथील सहसपूर भागात एका खासगी शाळेत दहावीत शिकत आहेत. शाळेच्याच वसतीगृहात त्या राहतात. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला चक्कर आली. त्यावेळी डॉक्टरांनी तिला दिवस गेल्याचे सांगितले. हे ऐकताच पीडितेच्या बहिणीने नातेवाईकांना याबद्दल कळवले. त्यानंतर हे प्रकरण समोर आले.
मुख्याध्यापक व शाळेतील चार विद्यार्थी शाळा सुटल्यावर वर्गातच आपल्यावर लैंगिक अत्याचार करत होते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक, ४ विद्यार्थी व इतर ४ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
summary-dehradun-minor-raped-by-principal
























































