
शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिरादरम्यान असणारा म्हाळुंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्ष होत आले, तरी नव्या पुलाचे बांधकाम केले नाही. या कामाची निविदा निघूनही कामास सुरुवात करण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ शहरातील म्हाळुंगे पूल बनाव कृती समितीच्या वतीने आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले, म्हाळुंगी नदीवरील पूल तुटून जवळपास 15 महिने उलटून गेले आहेत. या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही साधारण 15 दिवस उशिरा प्रशासनाने कामाचा आदेश काढला. नवीन पुलाच्या कामाची निविदा 5 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती व ही निविदाप्रक्रिया पूर्ण करून 25 जानेवारीला आदेश काढला. सध्या जुन्या पुलावरील जलवाहिन्या स्थालांतरित करीत नाहीत, तोपर्यंत नवीन पूलउभारणीचे काम सुरू करणे अशक्य असल्याची माहिती असूनही या जलवाहिन्या स्थलांतरण कामाची निविदा उशिरा प्रसिद्ध केली.त्यामुळे प्रशासनाची दिरंगाई दिसून येते. प्रशासनाच्या निषेधार्थ कृती समितीच्या वतीने उपोषणास सुरुवात करणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अमोल डुकरे, अमित देव्हारे, किरण पाटणकर आदींच्या सह्या आहेत.
भाजपच्या दोन गटांत वाद
पुलाच्या बांधकामाबाबत स्थानिक भाजपच्या दोन गटांमध्ये छुपे शीतयुद्ध सुरू असल्याचे बोलले जात आहे. एका गटाने तांत्रिक बाबींचा आधार घेत या पुलाचे काम तांत्रिक बाबी पूर्ण केल्याशिवाय सुरू करू नये, असा पवित्रा घेतला आहे. यामध्ये शहर भाजपचे पदाधिकारी सहभागी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपचा एक गट पूल पूर्ण करण्यासाठी, तर दुसऱया गटाकडून पुलाबाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित करून या कामात खोडा घालत असल्याचे बोलले जात आहे.


























































