
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण तापले आहे. पाटण्यात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यात्रेत सहभागी होत इंडिया आघाडीस पाठिंबा दिला आहे. मतदार यादीतून नाव काढणे, हे दहशतवादापेक्षाही भयानक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रियंका गांधी, राजद नेते तेजस्वी यादव यांनी केंद्र आणि नितीशकुमार सरकारवर हल्ला चढवला.
भाजपने मतचोरी करत देशात आणि इतर राज्यांत सत्ता काबीज केली आहे. याला केंद्रीय निवडणूक आयोगही तितकाच जबाबदार असल्याची टीका होत आहे. यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजणार आहे. एम. के. स्टॅलिन म्हणाले की, जनतेच्या कल्याणासाठी रक्षणासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. ही मैत्री आम्हाला बिहार विधानसभा निवडणूक जिंकून देईल. भाजपचे विश्वासघातकी राजकारण हरणार आहे. बिहारमध्ये ६५ लाख लोकांना मतदार यादीतून वाढणे हे दहशतवादापेक्षाही धोकादायक असल्याचे ते म्हणाले.