भाजप तीस वर्षांत पहिल्यांदाच लढणार आडवाणींशिवाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

गेल्या तीस वर्षांत भाजप पहिल्यांदाच पक्षाचे ‘पुराणपुरुष’ लालकृष्ण आडवाणी यांच्याशिवाय लोकसभा निवडणूक लढणार आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या 182 उमेदवारांच्या यादीतून गुजरातच्या गांधीनगरचे प्रतिनिधित्व करणारे आडवाणी यांचे नाव कापण्यात आले आणि त्यांची ‘जागा’ भाजप अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आली. पक्षाच्या या निर्णयामुळे राममंदिर आंदोलनातून भाजपला शून्यापासून शिखरापर्यंत नेणारे ‘पितामह’ आडवाणी हे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत.

आडवाणी यांनी पहिली लोकसभा निवडणूक 1989 सालात नवी दिल्लीतून लढवून जिंकली होती. त्यानंतर त्यांनी 1991 च्या निवडणुकीत गुजरातच्या गांधीनगर या मतदारसंघातून लोकसभा गाठली. 1996 सालात जैन डायरीमध्ये नाव आल्यामुळे आडवाणींनी राजकीय शुचितेचा वस्तुपाठ देण्यासाठी गांधीनगरच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर 1998 साली त्यांना त्या प्रकरणात ‘क्लीन चिट’ मिळाली. पुढे त्यांनी त्याच मतदारसंघातून 1999, 2004, 2009, 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. आता ती ‘जागा’ भाजपात आपल्या प्रारंभीच्या काळात तिथेच निवडणूक व्यवस्थापनाचे काम केलेल्या अमित शहा यांच्याकडे गेली आहे.

शहांमुळेच आडवाणी जिंकायचे!

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आडवाणींऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाचे जोरदार समर्थन केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केले असून ‘आडवाणी यांच्या प्रत्येक विजयामागे अमित शहाच होते’ असे त्यांनी म्हटले आहे. आडवाणी पक्षाच्या प्रचारासाठी देशभर दौरे करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची सारी मदार अमित शहा यांच्यावर असायची. शहा यांनी आडवाणींचा विजय सुकर केला. शहा यांचा निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात हातखंडा असल्याचेही जावडेकर यांनी पुढे सांगितले.

भाजपचे दुसरे अध्यक्ष
1980 सालात स्थापन झालेल्या भाजपचे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष. त्यानंतर 1986 सालात आडवाणी हे भाजपचे दुसरे अध्यक्ष बनले होते. 1989 सालात ते दिल्लीतून लोकसभेत निवडून गेले होते हे खरे, पण त्याआधी ते चार वेळा राज्यसभेचे सदस्य होते. त्यामुळे 1970 पासूनच ते संसदेचा भाग बनले होते.

1998 ते 2004 -वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान.

2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवल्यामुळे ती संधी आडवाणी यांना वयाच्या 86 व्या वर्षी गमवावी लागली. त्यानंतर पक्षाने त्यांचा समावेश मार्गदर्शक मंडळात केला. आता लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे आडवाणी यांच्या सक्रिय राजकारणाचा अंतच झाला आहे.

राज्यसभेत धाडणार
गुजरातच्या गांधीनगरचे लोकसभेत तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केलेल्या लालकृष्ण आडवाणी यांना मे महिन्यात अमित शहा यांच्या जागी राज्यसभेत धाडण्याचे भाजपने ठरवले आहे. तसा ‘संदेश’ आडवाणी यांना भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच देण्यात आल्याचे पक्षाच्या मुख्यालयातील सूत्रांनी सांगितले.