प्रदूषणामुळे दिल्लीत 50 टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ , शासकीय कार्यालय आणि खासगी कंपन्यांसाठी आजपासून नियम लागू

कोरोना काळात सुरू झालेले वर्फ फ्रॉम होम नियम दिल्लीत पुन्हा एकदा लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रदूषण प्रचंड वाढल्याने दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांतील कर्मचाऱयांना 50 टक्के वर्फ फ्रॉम होम बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयामध्ये अर्धे कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित राहतील तर अर्धे कर्मचारी हे घरून काम करतील. दिल्ली सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 50 टक्के वर्क फ्रॉम होमचे नियम उद्या, 18 डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत.

दिल्लीतील हवेत मिसळलेले विष कमी होण्याचे नावच घेत नाहीये. शहरात बुधवारी सकाळी एअर क्वालिटी इंडेक्स 328 होता. हवेची पातळी ‘खूप खराब’ श्रेणीत नोंदवली गेली आहे. शहरात सकाळपासून धुराचे वातावरण आहे. जगभरातील शहरांची हवेची गुणवत्ता मोजणाऱया स्विस कंपनी आयक्यूएअरनुसार, दिल्ली जगातील तिसरे सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. 425 एक्यूआयसह पाकिस्तानातील लाहोर हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. दिल्लीत ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनचा तिसरा टप्पा (ग्रेप-3) लागू झाल्यामुळे बांधकाम कामे बंद आहेत. यामुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार नुकसानभरपाई म्हणून सर्व नोंदणीकृत आणि पडताळणी केलेल्या बांधकाम मजुरांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करणार आहे.

तरच पेट्रोलडिझेल मिळेल

दिल्लीत उद्यापासून पेट्रोल पंपावर वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) दाखवावे लागणार आहे. ज्या वाहनधारकांकडे हे प्रमाणपत्र नसेल अशा वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. तसेच दिल्लीबाहेरील बीएस-6 वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. दिल्लीत बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवरही बंदी कायम राहील. बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱया वाहनांवर मोठा दंड आकारला जाईल.