
शनिवारी पडलेल्या हलक्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला आळा बसला असला तरी दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान वाहतूक पुरती ढेपाळली. येथे येणारी 32 उड्डाणे दुसऱया मार्गाने वळवावी लागली. हे धुके एवढे दाट होते की येथे दिवसाढवळ्याही लाइट लावून मोटारी चालवाव्या लागत होत्या. रविवारी तर एअर क्वॉलिटी इंडेक्समध्ये पीएम-2.5चा स्तर 600 अंकांवर पोहोचला होता.
धुक्यामुळे समोरचे काहीच दिसेनासे झाल्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱयांना विमानांचे नियोजन करण्यातही अडथळे येत होते. खराब हवामानामुळे येथे रविवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच टी-3 टर्मिनलवर विमानांचे संयोजन करणाऱया अधिकाऱयांना त्रास होऊ लागला. या दाट धुक्यामुळे मग 32 उड्डाणे जयपूर, अमृतसर आणि लखनौ येथे वळवण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
आठवडाभरात धुके आणखी वाढणार!
प्रचंड वाढणाऱया प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा व महाविद्यालये शनिवारी बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर रविवारी नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील शाळाही बंद करण्याची घोषणा करण्यात आली. आता येथील सर्व शाळा 5 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. येत्या आठवडाभरात दिल्लीत वातावरण पावसाळीच राहण्याची शक्यता असून या पूर्ण आठवडय़ात जोरदार वारे आणि हलका पाऊस पडणार आहे. त्यामुळे धुके आणखी दाट होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे.


























































