
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. 11 जून रोजी विमानतळावर उतरताना इंडिगोच्या विमानाचा मागील भाग जमिनीवर जोरात आदळला. यानंतर विमान वाहतूक सुरक्षा नियामक (DGCA) ने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी याबाबत माहिती देताना डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीजीसीएच्या आदेशानुसार विमान कंपनीने त्या विमानातील क्रू मेंबर्सना उड्डाण करण्यापासून रोखले आहे. इंडिगोने एका निवेदनात या घटनेला दुजोरा दिला आहे.
11 जून रोजी, इंडिगो फ्लाईट A321Neo ऑपरेटिंग फ्लाइट क्रमांक 6E-6183 हे कोलकाता येथून आलेले विमान दिल्ली विमानतळावर उतरत असताना जमिनीवर आदळले. विमान दिल्लीत लँड होईपर्यंत ते सामान्य स्थितीत होते. यावेळी चालक दलाला धावपट्टी 27 जवळ येताना जास्त वेळ लागल्याचे जाणवले. यावेळी हे विमान जमिनीवर आदळल्याने विमानाचा मागील भाग खराब झाल्याचे त्यांनी सांगितले.


























































