
राजधानी दिल्लीची हवा विषारी बनली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये दिल्ली देशातील सहाव्या क्रमांकाचे प्रदूषित शहर राहिले. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअरच्या (सीआरईए) अभ्यासात ही धक्कादायक आकडेवारी दिसून आलीय. दिल्लीच्या आजूबाजूचा भाग म्हणजे गाझियाबाद, नोएडा, रोहतक आणि धारुहेडा हे तर दिल्लीपेक्षा अधिक प्रदूषित झालेत. एनसीआर आणि इंडो-गंगेटिक प्लेनमध्ये हवेची गुणवत्ता खूप बिघडली आहे. सीआरईएच्या रिपोर्टनुसार, हरयाणातील धारुहेडा शहर ऑक्टोबरमधील सर्वात प्रदूषित शहर आहे. धारुहेडा शहरात प्रदूषणाची पातळी राष्ट्रीय मानकापेक्षा दुप्पट आढळली. धारुहेडामध्ये ऑक्टोबर महिन्यातील 20-21 दिवस तर प्रदूषणाने सीमा ओलांडली होती. त्यापैकी दोन दिवस तर परिस्थिती गंभीर होती. या आकडय़ावरून असे दिसतेय की, केवळ दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण एनसीआर प्रदूषणाच्या विळख्यात आहे.
दिल्ली आणि परिसरात केवळ गवत जाळून प्रदूषण झालेले नाही. खरे कारण वाहनांचा धूर, बांधकामाची धूळ, कारखान्यांतील उत्सर्जन, कचरा जाळणे, डिझेल जनरेटर अशी आहेत. प्रदूषणाचे हे स्रोत वर्षभर चालू असतात. त्यामुळे केवळ ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनने प्रदूषणावर नियंत्रण मिळवू शकत नाही.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअरच्या अहवालानुसार, टॉप 10 प्रदूषित शहरांच्या यादीत अधिकतर एनसीआर आणि हरयाणातील शहरे आहेत. यामध्ये रोहतक, गाझियाबाद, नोएडा, वल्लभगढ, भिवाडी, ग्रेटर नोएडा, हापुड आणि गुडगाव यांचा समावेश आहे. म्हणजे पूर्ण एनसीआर रेड झोनमध्ये आहे. तिथली हवा विषारी आहे.
मेघालयातील शिलाँग देशातील सर्वात शुद्ध हवेचे शहर ठरले आहे. तामीळनाडू आणि कर्नाटकच्या काही शहरांनीही प्रदूषणाबाबत चांगली कामगिरी केली आहे.


























































