Delhi Bomb Blast – उमर सहा महिने हॉस्पिटल आणि विद्यापीठातून गायब होता, दोन शिकाऊ डॉक्टरांनी दिली संशयास्पद माहिती

दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाने 23 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर तपास यंत्रणांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत एक-एक गोष्टीचा छडा लावत आहेत. या स्फोट प्रकरणात अल फलाह विद्यापिठाचे 200हून अधिक डॉक्टर स्टाफ तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशातच आता विद्यापिठाच्या अप्रेंटिसशीप करणाऱ्या दोन डॉक्टरांनी 2023 मध्ये उमर सहा महिने रुग्णालय आणि विद्यापीठातून गायब होता, असा उलगडा केला आहे.

दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाशी संबंधित जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलच्या तपासात अल फलाह विद्यापीठ हे एक प्रमुख केंद्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील 200हून अधिक डॉक्टर आणि कर्मचारी तपास संस्थांच्या देखरेखीखाली आहेत. कारण तपासात संस्थेतील दहशतवादी कारवायांशी खोलवरचे संबंध उघड झाले आहेत. विद्यापीठातील सुरक्षा संस्थांकडून सतत होत असलेल्या तपासणीमुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी विद्यापीठातील अनेक कर्मचारी त्यांचे सामान पॅक करून त्यांच्या वाहनांमध्ये जाताना दिसले. विद्यापीठातील सूत्रांचे म्हणणे आहे की, सुट्टी घेतल्याने ते घरी परतत आहेत. तपास यंत्रणा स्फोटानंतर विद्यापीठ सोडलेल्या लोकांची संख्या आणि ओळख पटवण्याचे काम करत आहेत. त्यांना संशय आहे की, त्यातील अनेकजण दहशतवादाशी जोडलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोकांनी आपला मोबाईल डाटा डिलीट केला आहे. त्याचाही तपास लावला जात आहे. पोलीस हॉस्टेल आणि कॅम्पस बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा तपास करत आहे. आतापर्यंत हजारहून जास्त लोकांची चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी नूह की हिदायत कॉलनीत एका 35 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेने दहशतवादी डॉ. उमर याला खोली भाड्याने दिली होती. बॉम्बस्फोटानंतर ही महिला फरार होती. या घटनेनंतर तिच्या कुटुंबाचीही चौकशी केली जात आहे. त्याने नूहच्या भाड्याच्या खोलीत अनेक मोबाईलचे सीम बदली केले होते.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटानंतर फलाह रुग्णालयाचा दहशतवादी संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर अल फलाह मेडिकल कॉलेजमधील रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज अंदाजे 200 रुग्णांना भेट देणारी ओपीडी आता 100 पेक्षा कमी झाली आहे. विद्यापीठातून एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या दोन शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले की, 2023 मध्ये उमर विना सुट्टी घेता सहा महिने हॉस्पिटल आणि विद्यापीठातून गायब होता. परतल्यानंतर तो थेट ड्युटीवर आला आणि त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई झाली नाही. तो पूर्णवेळ मुलांना शिकवत नसल्याने अन्य प्राध्यापक त्याच्यावर नाराज होते. तो आठवड्यातून एक किंवा दोन लेक्चर घेत होता आणि तेही 15 ते 20 मिनीटांचे असायचे. त्यानंतर तो त्याच्या खोलीत परतायचा. तसेच उमरला रुग्णालयात संध्याकाळी आणि रात्रीची शिफ्ट दिली जायची. त्याला कधी मॉर्निंग शिफ्ट दिली नाही. त्यामुळे उमरला संस्थेत विशेष वागणूक देण्यात येत असल्याने विद्यापीठात कोणी हँडलर होता का? हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.