Delhi Bomb Blast- लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाॅम्ब स्फोटाचे पुलवामा कनेक्शन, वाचा

सोमवारी (10 अाॅक्टोबर) संध्याकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्ली एका मोठ्या कार बॉम्बस्फोटाने हादरली. दिल्लीचे हृदय असलेल्या लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाला, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. फरिदाबाद ते पुलवामा कनेक्शन समोर आले आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की स्फोटात वापरलेली कार पुलवामा येथील डॉ. उमर मोहम्मद चालवत होते, जे फरिदाबादमध्ये स्फोटकांचा साठा जप्त झाल्यापासून फरार होते.

एनआयए आणि इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) पासून ते दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांपर्यंत सर्वजण या दहशतवादी हल्ल्यामागील धागेदोरे शोधण्याचे काम करत आहेत. लाल किल्ल्याबाहेर झालेला कार स्फोट हा दहशतवादी हल्ला होता असे सूत्रांचे म्हणणे आहे. कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती आणि त्यात स्फोट घडवण्यात आला. तपास यंत्रणांना आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय आहे. स्फोटात वापरलेली कार खरेदी करणाऱ्या पुलवामा येथील रहिवासी तारिकला आता अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेला आहे. गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉ. उमर मोहम्मद हे स्फोटात वापरलेल्या आय-२० कारमध्ये प्रवासी होते. कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी पोलिस कारमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्याची तयारी करत आहेत. फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभागी असलेला दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद फरार आहे.

सोमवारी संध्याकाळी ६:५१ वाजता दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील पार्किंगमध्ये एका कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की २००-३०० मीटरच्या परिघात सर्वकाही हादरले. स्फोटात वापरलेल्या कारवर हरियाणाचा नोंदणी क्रमांक होता. आज सकाळी हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात सुमारे २,९०० किलो स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली स्फोटात पुलवामा येथील रहिवासी उमर मोहम्मदचे नाव समोर आले आहे. उमर हा व्यवसायाने डॉक्टर आहे. उमर हा जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित आहे, ज्याच्या सात दहशतवाद्यांना रविवारी पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्याकडून २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती.