
दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेनुसार दहशतवादी डॉ. उमर हा हल्ल्याच्या दोन आठवड्यापूर्वी पुलवामाच्या क्विल गावात राहायला आला होता. तिथे आपल्या भावाला भेटून तो लगेच निघून गेला. या भेटीत उमरने त्याच्या भावाकडे एक महत्त्वाचे काम सोपावले आणि निघून गेला होता.
उमर त्याच्या भावाला भेटायला गेला त्यावेळी त्याने त्याच्याकडे एक मोबाईल दिला होता आणि मला काही झाले तर, माझा मोबाईल पाण्यात फेकून दे, असे म्हटले होते. उमरच्या भावाने त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्याचा फोन जवळच्या तलावात फेकला. फॉरेन्सिक तज्ञांनी पाण्यातून तो मोबाईल काढला आणि त्यातून त्यांना डेटा यशस्वीरित्या काढता आला. त्यांना दहशतवादी जसीर बिलाल वाणीकडून फोनवर रेकॉर्ड केलेले अनेक कट्टरपंथी व्हिडिओ आणि उमरचा व्हिडिओ देखील सापडला. व्हिडिओमध्ये उमर आत्मघाती बॉम्बस्फोटांना शहीद मिशन म्हणून समर्थन देताना दिसत आहे. फॉरेन्सिक विश्लेषणातून इस्लामिक स्टेट (ISIS) आणि अल-कायदाशी संबंधित प्रचार, प्रवचने आणि फोनवरील व्हिडिओंसह मोठ्या प्रमाणात अतिरेकी साहित्य आढळून आले आहे. हे साहित्य उमरच्या वाढत्या कट्टरतावादाकडे आणि दहशतवादी नेटवर्कशी संपर्कात आल्याने त्याचे विचार लक्षात येतात. उमरने हे व्हिडिओ त्याच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलच्या इतर सदस्यांना आत्मघाती हल्ले करण्यासाठी प्रभावित करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी तयार केले होते. हे व्हिडिओ त्याने जवळपास दोन डझन व्यक्तींना पाठवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमरच्या कुटुंबयांनी त्याचे शिक्षण पाहता तो दहशतवादामध्ये सहभागी झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याच्या भावाने दावा केला आहे की, त्याचा फोन खराब होता. त्यामुळे सामग्रीबाबत काहीच माहिती नव्हती. तपासादरम्यान त्याच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली. उमरची ओळख पटवण्यासाठी त्याच्या आईचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले. नंतर सुरक्षा दलांनी पुलवामा येथील उमरचे घर उद्ध्वस्त केले.




























































