
शेतकऱयांच्या आंदोलनाला न जुमानणाऱया मोदी सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्राचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱयांसाठी ‘डेथ वॉरंट’ आहे. देशातील शेतकरी गद्दार नाहीत. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर शेतकऱयांनी नव्हे तर भाजप सरकारनेच हिंसाचार घडवला. दिल्लीचे रस्ते माहीत नसलेल्या शेतकऱयांची सरकारने दिशाभूल केली, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
मेरठच्या किसान महापंचायतीत बोलताना केजरीवाल यांनी केंद्राच्या अनास्थेवर हल्ला चढवला. भाजप सरकार ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहे. देशातील शेतकरी प्रचंड त्रासलेले आहेत. ते कुटुंबीयांसोबत गेल्या तीन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत आंदोलन करताहेत. पुणी मजा म्हणून असे आंदोलन करीत नाही. शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 250 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र केंद्राला याचे काहीही पडलेले नाही. पिकाला चांगला भाव मिळाला असता तर शेतकऱयांनी आत्महत्या केली नसती. शेतकऱयांची आता जीवनमरणाची लढाई सुरू आहे. कृषी कायदे हे शेतकऱयांसाठी एक प्रकारचे ‘डेथ वॉरंट’ आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
आंदोलन संपवण्यासाठी शेतकऱयांना डांबण्याचा डाव
शेतकऱयांचे आंदोलन संपवण्यासाठी त्यांना तुरुंगात डांबण्याचा डाव केंद्राने आखला होता. शेतकऱयांना दिल्लीत येऊ दे, मग त्यांना तुरुंगात डांबू, असे केंद्राचे नियोजन होते. या हेतूने त्यांना दिल्लीतील 9 स्टेडियममध्ये तुरुंग उभारायचे होते. मात्र फाईल मंजुरीचा अधिकार माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.





























































