
जेएनयू हिंसाचार प्रकरणात आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईवरून काँग्रेसने बुधवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गुन्हेगार सोडून पीडितांविरुद्ध गुन्हे दाखल करणे हे आता नित्याचेच झालेय, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी जेएनयूत घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह इतरांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यावर खेरा यांनी प्रतिक्रिया दिली. 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी, महागाई, सरकारचा मनमानी कारभार तसेच दिलेली आश्वासने न पाळण्याची प्रवृत्ती या सर्व गोष्टींमुळे देशाचे संतापाचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. समाजाचा प्रत्येक घटक घाबरलेला आहे, अशा शब्दांत खेरा यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले.
जेएनयू हल्लाप्रकरण; त्या हल्लेखोरांची ओळख पटली
जवाहरलाल नेहरू विद्यापिठात घुसून शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणा-या अज्ञातांची ओळख आता पटली आहे. हे सर्वजण चेहरा झाकून आले होते. हल्लेखोरांपैकी काहीजणांची ओळख पटवण्यात आली असून पोलिसांकडे एकूण 11 तक्रारी प्राप्त झाल्याचे सरकारी सुत्रांनी म्हटले आहे. एक तक्रार प्राध्यापकाकडून आली असून तीन तक्रारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सात जेएनयूएसयू आणि अन्य विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या. पोलिसांनी सर्व तक्रारी गुन्हे शाखेकडे वर्ग केल्या आहेत. दरम्यान, घटना घडून तीन दिवस उलटले तरीही एकालाही अटक करण्यात आलेली नाही.
























































