
दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर याला जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ काळ तुरुंगात असलेल्या सुकेशला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असला, तरी न्यायालयाने त्याच्यावर कडक अटी लादल्या आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, खटल्याच्या निकालाविना वाजवी कालावधीपेक्षा जास्त काळ कोठडीत ठेवणे हे व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्याचे आणि जलद सुनावणीच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.
न्यायालयाने सुकेश चंद्रशेखरला 5 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत, ज्यानुसार त्याला आपला पासपोर्ट जमा करावा लागेल आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. तसेच, त्याने पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे. यासोबतच त्याला आपला पत्ता आणि मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे.
हे प्रकरण 2021 मध्ये उघडकीस आले होते, जेव्हा सुकेश चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात राहून 200 कोटी रुपयांची खंडणी आणि फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान असे समोर आले होते की, सुकेशने फसवणुकीच्या पैशातून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती.

























































