दिल्ली डायरी – शिवराजमामांचा दबदबा वाढला!

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

बिहार विधानसभेच्या निकालाप्रमाणेच मध्य प्रदेशातील 29 विधानसभा पोटनिवडणुकांकडेही देशाचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या साथीत शिवराज यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांचे बूड ‘स्थिर’ नव्हते. मात्र पोटनिवडणुकांच्या निकालानंतर शिवराजमामांचा दबदबा वाढला आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपवासी झाल्यामुळे या निवडणुकीत ते काय चमत्कार वगैरे करतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले होते. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बनू पाहणाऱया ज्योतिरादित्य यांचे पंख पद्धतशीरपणे कापण्यात मुरब्बी शिवराजमामा यशस्वी झाले. राष्ट्रीय राजकारणाचा अन्वयार्थ लावायचा झाल्यास शिवराज यांच्या रूपाने भाजपकडे एक सशक्त ‘पर्याय’ निर्माण झाला आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या पायाखालचे मध्य प्रदेशातील सत्तेचे जाजम कोरोना काळातच खेचून घेतल्यानंतर तेथे आपल्या मर्जीतील मुख्यमंत्री बसविण्याचा भाजप श्रेष्ठाRचा इरादा होता. त्यासाठी नरोत्तम मिश्रा यांचे नावही नक्की झाले होते. मात्र कोरोनामुळे परिस्थितीच अशी निर्माण झाली की अत्यंत अभूतपूर्व स्थितीत मध्य प्रदेशात सत्तांतर झाले. या स्थितीचा फायदा घेत शिवराजसिंग यांनी धोरणी राजकीय डाव टाकले, आमदारांना वश करत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा पटकावली आणि स्वतःला एकप्रकारे राजकीय जीवनदानही मिळविले. एकेकाळी बिमारू असलेल्या मध्य प्रदेशात शिवराजसिंग यांनी उल्लेखनीय काम केले. सलग तीन वेळा मध्य प्रदेशासारख्या मोठय़ा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यामुळे शिवराजमामा संघ मुख्यालयाचेही खासमखास झाले. दिल्लीत मोदी-शहा यांचे आगमन झाल्यानंतर शिवराजसिंग यांच्या राजकीय ओहोटीला सुरुवात झाली. एरव्ही कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱया भाजपतील चाणक्यांनी मध्य प्रदेशची गेली निवडणूक फारशी सीरियसली घेतली नाही. शिवराजसिंग पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत ही त्यामागची रणनीती होती, असे आजही बोलले जाते. कमलनाथ त्यामुळेच अपघाताने तिथले मुख्यमंत्री बनले आणि अपघातानेच पायउतारही झाले. ज्योतिरादित्य शिंदेंसारख्या काँगेसी नेत्याला भाजपमध्ये आणून शिवराज यांना नांदत्या घरात सवत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात नरेंद्रसिंग तोमर, नरोत्तम मिश्रा या नेत्यांना ताकदही देण्यात आली. मात्र शिवराजसिंग वरताण ठरले. मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत 28 पैकी 19 जागा जिंकून शिवराजमामांनी केवळ आपले डळमळीत आसनच स्थिर केलेले नाही, तर राष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेनेही एक पाऊल टाकले आहे. ‘हा देश दोन लोक चालवतात’ अशी वदंता आहेत. शिवराज सिंग या दोघांतला ‘तिसरा’ होऊन बाकी सगळं विसरा, असे करतात का हे येणारा काळच ठरवेल!

‘किंमत’ मोजली

भाजपातले दुसरे मोदी म्हणून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची एक ओळख होती. जातीपातींची समीकरणे जमेची नसतानाही मोदी आडनावाचा माणूस बिहारच्या राजकारणात वर्षानुवर्षे टिकलाच कसा, असाही सवाल यानिमित्ताने अनेकदा विचारला जायचा. संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या राजकारणातून पुढे भाजपमध्ये आल्यानंतर सुशीलकुमार मोदींनी बिहारात आपले बस्तान बसवले. नितीशकुमार व सुशीलकुमार यांची जोडी ‘तुझी माझी जोडी जमली’प्रमाणेच राजकारणात चांगलीच जमली. बारा-चौदा वर्षे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपद अशी साथसोबत केल्यानंतर भाजपने आता सुशीलकुमार मोदींच्या हाती नारळ दिला आहे. मोदींऐवजी दोन नव्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपने एकप्रकारे सुशीलकुमार यांची ‘मार्गदर्शक मंडळा’त रवानगी केली आहे. या गच्छंतीमागे दिल्लीतल्या मोदींची खप्पामर्जी असल्याचे बोलले जात आहे. सुशीलकुमार मोदी हे भाजपचे नेते असले तरी ते तसे कधीच वागले नाहीत. कायमच नितीशबाबूंचा ‘राईटहॅण्ड’ अशा पद्धतीने त्यांनी काम केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी रोष होता. सुशीलकुमारांच्या राजकारणामुळेच भाजपला बिहारमध्ये ‘आत्मनिर्भर’ होता आले नाही. त्याचबरोबर या गच्छंतीमागचे सर्वात मोठे कारण ठरले ते नितीशकुमारांचे कौतुक . 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोदी-मोदीचा गजर वाजायला सुरुवात झालेली असताना, सुशीलकुमार मोदींनी नितीशकुमार हे ‘पीएम मटेरियल’ असून तेच पंतप्रधान होतील, असे छातीठोकपणे सांगितले होते. सहा वर्षांनंतर त्या विधानाची ‘किंमत’ सुशीलकुमारांना मोजावी लागली.

मेवालाल यांचा राजीनामा…

राजकीय जीवनात राज्यकारभार करताना शैक्षणिक गुणवत्ता उपयोगी पडतेच असे नाही. व्यक्ती उच्चविद्याविभूषित असेल तर त्याची तशी छाप पडतेच. उलट फारसे न शिकलेल्या लोकांनीच आजवर देशाचे राजकारण गाजविल्याची अनेक उदाहरणे देता येतील. अर्थात, ज्या भाजपमध्ये बोगस पदव्या आणि शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब आहे. अशा या पक्षाने बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या अशिक्षित असण्याचा मुद्दा प्रचारात गाजवला होता. ‘अनपढ तेजस्वी आपका क्या भला करेगा?’ असा सवाल भाजपवाले सभांमधून जनतेला विचारत होते. खरे तर ज्या पक्षात शिक्षणाच्या दिव्याखाली पदव्यांचा अंधार पसरला आहे, त्यांनी असा सवाल करणे म्हणजे निव्वळ निखळ मनोरंजनच होते. बिहारी जनतेने भाजपच्या प्रचाराला दाद दिली नाही व तेजस्वीला सर्वात मोठय़ा पक्षाचा नेता बनवले. मात्र, आता बिहारच्या राजकारणात अनपढपणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याचे कारण ठरले आहे ते नितीशबाबूंचे नवे मंत्रिमंडळ. भाजपचे नवेकोरे उपमुख्यमंत्री तारकेश्वर प्रसाद हे बारावीदेखील उत्तीर्ण नाहीत. त्यांच्याकडे अर्थखात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या नव्या सरकारमध्ये शिक्षणासारखे महत्त्वाचे खाते सांभाळणारे मेवालाल चौधरी हे राष्ट्रगीत म्हणता येत नसल्याने सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. हे चौधरी महाशय बिहारातल्या एका विद्यापीठाचे माजी कुलगुरूही आहेत. कुलगुरू असतानाही थेट भरती प्रक्रियेत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. यावरून बिहारमधल्या नव्या सरकारवर टीकेची झोड उठू लागल्यानंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रीपदाच्या स्वाक्षरीची शाई वाळत नाही तोच आपला राजीनामा दिला आहे. नितीशकुमारांच्या नव्या सरकारला मेवालालांच्या निमित्ताने नमनालाच घडाभर तेल घातले गेले आहे. या सगळय़ा प्रकारानंतर बिहारमधल्या एकंदरीत शिक्षण व्यवस्थेची व राजकारणाची काय दैना असेल याची कल्पना केलेलीच बरी. तेजस्वीच्या अशिक्षितपणाचा बाऊ करणाऱया भाजपला आता मेवालालांच्या निमित्ताने चांगलाच धडा मिळाला आहे. त्यातून त्यांनी बोध घ्यावा इतकेच!

आपली प्रतिक्रिया द्या