दिल्ली डायरी – ‘झाबुआ’चा ‘हनिट्रप’; कमलनाथांचे काय होणार?

886

>> नीलेश कुलकर्णी,  [email protected]

कर्नाटकातले कुमारस्वामी सरकार ‘ऑपरेशन लोटस’मुळे गडगडल्यानंतर भाजपचे पुढील लक्ष्य मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार असेल हे उघड झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपली खुर्ची वाचविण्यासाठी ‘हनिट्रप’चे प्रकरण बाहेर काढून एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाची ‘व्याप्ती’ मोठी असून त्यात भाजपची काही मंडळी आणि एक माजी मुख्यमंत्रीही अडकले असल्याची वदंता आहे. त्यामुळे आपल्या खुर्चीला धोका नसल्याचा विश्वास कमलनाथ यांना वाटत होता. मात्र झाबुआ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे त्यांच्या खुर्चीला हादरे बसताना दिसत आहेत.

मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि भाजपमध्ये बहुमताची लढाई वर्ल्ड कप क्रिकेटच्या फायनलसारखी झाली आहे. 230 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे 114 तर भाजपकडे 108 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरुवातीपासूनच होत आहेत. भाजपच्या या प्रयत्नांना काटशह म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हनीट्रपचे प्रकरण बाहेर काढले आहे. त्याचा कितपत लाभ कमलनाथ यांना होतो हे भविष्यातच समजेल. मात्र सध्या रतलामच्या लोकसभेच्या जागेवर भाजपचे आमदार जी. एस. डामोर निवडून आल्यामुळे होत असलेली झाबुआ विधानसभेची पोटनिवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.

109 आमदार असलेल्या भाजपची सदस्यसंख्या डामोर खासदार झाल्यामुळे एकाने कमी झाली असली तरी ही पोटनिवडणूक पुन्हा जिंकून काँग्रेस सरकारला खाली खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपने भानू भुरिया नावाच्या तरुणाला मैदानात उतरवले आहे, तर काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरियांच्या रूपाने सगळी ताकद पणाला लावली आहे. मध्य प्रदेशातले बहुमताचे तागडे सतत इकडून तिकडे हेलकावे खात आहे. सरकार स्थापनेवेळी बसपासहित भाजपचे काही आमदार गळाला लावून कमलनाथांनी भाजपला धोबीपछाड दिली होती. मात्र त्यानंतर काँग्रेसअंतर्गत संघर्ष उफाळून आल्याने कमलनाथ विरुद्ध ज्योतिरादित्य शिंदे अशी उघड फूट काँग्रेसमध्ये पडल्याचे दिसून येत आहे. त्याचाच फायदा घेऊन मध्य प्रदेशातले काँग्रेस सरकार हद्दपार करून तिथे कमळ फुलविण्याचा भाजप श्रेष्ठाRचा इरादा आहे. अर्थात फोडाफोडीच्या राजकारणातले चार पावसाळे जास्तच अनुभवलेल्या कमलनाथ यांनाही त्याला काटशह म्हणून हनिट्रपचे प्रकरण उघडकीला आणले. त्यामुळे खळबळ उडाली खरी, मात्र झाबुआच्या निवडणुकीने स्वतः कमलनाथच राजकीय हनिट्रपमध्ये अडकतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आदिवासीबहुल मतदारसंघात कोणताही दगाफटका व्हायला नको म्हणून कमलनाथ यांनी लोकसभेला पराभूत झालेल्या कांतिलाल भुरिया यांनाच मैदानात उतरवले आहे. झाबुआची पोटनिवडणूक भाजपने जिंकल्यास कमलनाथ सरकार गडगडणार असे भाकीत अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या कैलाश विजयवर्गीय यांनी वर्तवले आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा अनुभव लक्षात घेता विजयवर्गीय यांचे भाकीत वरवरचे ठरवता येणार नाही. त्यामुळे झाबुआत कमलनाथ सध्या तळ ठोकून बसले आहेत. कमलनाथांच्या बहुमत परीक्षणावेळी ऐनवेळी काँग्रेसची साथ दिलेले नारायण त्रिपाठी पुन्हा स्वगृही परतल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. त्यामुळे झाबुआनंतर बहुमताचे पारडे वर्ल्ड कपप्रमाणे सुपर ओव्हरमध्ये जाऊन निर्णायक क्षणी बदलू शकते.  हनिट्रपचे प्रकरण उचकवटून कमलनाथ यांनी ‘चाल, चरित्र व चेहऱया’चा बसता उठता जप करणाऱयांना चांगलेच लटकवले आहे. तेथील झाबुआच्या राजकीय ‘हनिट्रप’मधून कमलनाथ कसे बाहेर पडतात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.

राफेलचे लिंबू, पुरोगाम्यांचा मुरडा अन् भाजपची फसगत 

rajnath-singh-rafale

राफेल विमानाच्या चाकाखाली ‘लिंबू मिरची’ वगैरे ठेवून त्याची विधिवत पूजा हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यामुळे पुरोगाम्यांच्या पोटात भलताच मुरडा पडला होता. तो काही केल्या बरा होण्याची चिन्हे नाहीत. राफेलसारख्या लढाऊ विमानाची पूजा करणे कितपत योग्य असा सवाल ही पुरोगामी मंडळी करत आहे. दुसरीकडे याच मुद्यावर पुरोगाम्यांना फैलावर घेण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तर पुरोगाम्यांना या लिंबावरूनच चांगलेच तडकावले. मात्र आता एका व्हिडीओमुळे भाजपची फसगत होण्याची चिन्हे आहेत. काही पुरोगाम्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. 2017 मध्ये दिल्लीच्या मजेंठा मेट्रो लाइनच्या शुभारंभप्रसंगी मोदी यांनी लिंबू मिरचीचे स्तोम माजविणाऱयांवर चांगलेच कोरडे ओढले होते. ‘लोग अपने गाडी पर नींबू मिर्च और पता नही क्या क्या लगाते है. ऐसी अंधश्रद्धा में जीनेवाले लोग सार्वजनिक जीवन का बहुत अहित करते है’, असे पंतप्रधान त्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत असल्यामुळे त्याच्या ‘मिरच्या’ भाजपला झोंबताना दिसत आहेत. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकीत ‘कलम 370’ प्रमाणेच राफेलच्या लिंबू मिरचीचा तडका देण्याचा भाजपचा मनोदय होता, मात्र या व्हिडीओमुळे अंधश्रद्धेच्या मिरच्यांचा ठसका भाजपलाही लागला आहे हेच खरे !

हसिना आणि ‘जमदानी’ साड्या

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा हिंदुस्थान दौरा गाजला तो त्यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींशी घेतलेल्या गळाभेटीमुळे. मात्र हसीना यांच्या या भेटीत फारसे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. शेख हसिन यांचे वडील मुजीबूर रेहमान यांच्यापासून त्यांच्या कुटुंबाचा गांधी परिवार आणि प्रणव मुखर्जींशी कौटुंबिक स्नेह आहे. पंतप्रधान हसिना हिंदुस्थानात आल्या त्या प्रियंका आणि शर्मिष्ठा (प्रणव मुखर्जींची मुलगी) यांच्यासाठी खास जमदानी साडय़ा घेऊन. हसिना ‘दस जनपथ’वर आल्या त्यावेळी सोनियांसोबत गप्पा मारत असताना तिथे मनमोहन सिंग आणि आनंद शर्माही होते. मात्र राहुल आणि प्रियंका कुठेच दिसत नसल्याने हसिना यांनी त्याबाबत पृच्छा केली असता, सोनियांनी चिरंजीव राहुल कंबोडियाच्या महत्त्वपूर्ण दौऱयावर गेल्याचे सांगितले तर प्रियंका दिल्लीतच असल्याचे कळवले. हसिन यांनी प्रियंकाला बोलाविण्याची विनंती केली. ती सोनियांनी मान्य केली. त्यानंतर हसिनांनी मोठय़ा आत्मीयतेने प्रियंकाला मिठी मारून जमदानी साडी भेट दिली. प्रणव मुखर्जी दरवर्षी नवरात्रीत मूळ गावी देवीच्या पूजेसाठी जातात. यंदाही ते गावीच होते. मात्र शर्मिष्ठा दिल्लीतच असल्याने हसिना यांनी शर्मिष्ठांची भेट घेऊन त्यांनाही ही खास साडी भेट दिली. मुजिबूर रेहमान यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत इंदिरा गांधींनी छोटय़ा हसिनाची काळजी घेत शिक्षणासह सगळी व्यवस्था लावली होती. त्याची जबाबदारी इंदिराजींनी प्रणव मुखर्जींवर सोपविली होती. प्रणवदांनी नेहमीप्रमाणेच ती यशस्वीपणे पार पाडून, दोन देश आणि दोन कुटुंबांतील स्नेह, सौहार्द्र वाढीस लावले होते. शेख हसिनांच्या प्रियंका गांधींशी झालेल्या गळाभेटीमागचे हे ‘आपलुकी’चे खरे कारण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या