
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
महागाई संपवू, असे आश्वासन देणाऱया भाजपच्याच राजवटीत महागाई दिवसेंदिवस थैमान घालत आहे. नोटबंदी, जीएसटीने अगोदरच हैराण झालेल्या जनतेला महागाईने त्राही भगवान करून सोडले आहे. मात्र जनताही शांत आहे आणि विरोधकही गप्प आहेत. त्यावरून महागाई हा आता गैरलागू मुद्दा झाला आहे असे समजायचे, की ‘हे चालायचेच’ असे म्हणून जनतेने महागाईला अंगाखांद्यावर खेळवण्याचे ठरवले आहे असे समजायचे?
मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर असताना रस्त्यावर बसून गॅस मांडून आंदोलन करणाऱया स्मृती इराणी आणि राजनाथ सिंह यांचे चित्र जनतेच्या मनात अजूनही कायम आहे. त्याच गॅसचे भाव आज गगनाला भिडलेले असताना कोणी असे आंदोलन करताना दिसत नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ाला महागाईची फोडणी देऊन भाजपने 2014 मध्ये सत्ता खेचून घेतली. मनमोहन सिंगांच्या राजवटीपेक्षा आज देश प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर तर आहेच, मात्र महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. तरीही महागाई हा ‘मुद्दा’ का बनत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. महागाईच्या डायनने या देशात आजवर अनेक सरकारे घालवली. सुषमा स्वराज दिल्लीच्या काही काळासाठी मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यांच्या अगदी छोटेखानी कार्यकाळात कांद्याच्या दरवाढीने दिल्लीकरांना रडवले. त्यानंतर अजूनही दिल्ली भाजप सत्तेसाठी रडत आहे, हे नजीकच्या काळातले उदाहरण आहे. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाईचा मुद्दा फिका पडला. महागाईचे चटके बसले तरी आंदोलन करण्याच्या ‘मूड’मध्ये देशातील जनता नाही. याचे मुख्य कारण, जनतेला रोजच्या रोजीरोटीसाठी पळापळ करावी लागत आहे. त्यामुळे ‘राग आहे पण बळ नाही,’ अशी जनतेची अवस्था असताना विरोधकांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवून महागाईचा मुद्दा हाती धरायला हवा. जनतेचे लक्ष मूळ मुद्दय़ावरून विचलित करण्यासाठी मीडिया आणि सोशल मीडियातून सरकारतर्फे तालिबान, अफगाणिस्तान, तेथील क्रौर्य असे अनेक मुद्दे प्रकर्षाने मांडले जातील. कारण सरकारला स्वतःचे अपयश झाकण्यासाठी असे कोंबडे आरवत ठेवण्याची गरज आहे. मात्र विरोधकांनी कोंबडा आरवलाच आहे तर त्याची दखल घेऊन मैदानात उतरायला हवे. मनमोहन सिंग यांच्या काळात महागाईविरोधात देशात विरोधक रस्त्यावर बसून स्वयंपाक शिजवायचे. मोदींच्या काळातील महागाईविरोधात तर असंतोष रटरटायला हवा.
सुष्मिता देब यांचा राजीनामा
काँग्रेसमधून युवा नेत्यांचा पक्षाला अलविदा करण्याचा ‘सिलसिला’ थांबताना दिसत नाही. जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून हाती कमळ घेतल्याला फार दिवस उलटत नाहीत तोच आसाममधील एक आक्रमक नेत्या सुष्मिता देब यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. वास्तविक, जितीन प्रसाद व सुष्मिता देब यांना काँग्रेसने खूप काही दिले. मात्र हल्ली पदाशिवाय, सत्तेशिवाय राजकारण नाही, असा तोलमोल भाव करून पक्षांतरे केली जात आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसने केंद्रात मंत्री बनवले, मानमरातब दिला. मात्र मध्य प्रदेशात काँगेसचे भवितव्य नाही हे ताडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपले दोस्त सचिन पायलट यांच्यावरही त्यांनी गळ टाकला होता. मात्र राहुल व प्रियंका यांच्या हुशारीने ती मोहीम फिस्कटली. एकीकडे देशभरात भाजपविरोधात वातावरण असताना काँग्रेसमध्ये सुरू असलेली गळती नक्कीच सुखावणारी नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही या गळतीवर मार्मिक टिप्पणी केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ निष्ठावंतांनी कधी असे पक्षांतर केले नाही. नव्या पिढीतले लोक पक्षांतर करतात, अशी टीका त्यांनी केली आहे. आसामच्या राजकारणात आणि काँग्रेसमध्ये गौरव गोगोई यांना मानाचे स्थान देऊन आपल्याला डावलले जात असल्याची सुष्मिता देब यांची भावना झाली होती. त्यातूनच त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी धूर्तपणे डावपेच खेळताना दिसत आहेत. सुष्मिता देब यांना ममतादीदी राज्यसभेवर पाठविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला राज्यसभेतही एक आक्रमक व अभ्यासू महिला नेतृत्व मिळणार आहे. ममतादीदींच्या या बेरजेच्या राजकारणापासून काँग्रेसने बोध घ्यायला हवा.
योगी आदित्यनाथ विरुद्ध ठाकूर
‘योगी आदित्यनाथ विरुद्ध ठाकूर’ हे शीर्षक वाचून थोडे बुचकळ्यात पडायला होईल. कारण योगींचे राज्य हे हिंदूंचे नसून केवळ ठाकुरांचे राज्य आहे, अशी टीका उत्तर प्रदेशमधील विरोधी पक्ष नेहमीच करत असतात. मात्र ठाकूरधार्जिणे राजकारण करूनही योगींना आगामी निवडणकीत एका ठाकुराकडूनच कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा योगींचा मानस आहे. तसे झाले तर ते गोरखपूर या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. योगी आदित्यनाथांना घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती बनवली असून निवृत्त आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर हे योगींविरोधात शड्डू ठोकतील असे मानले जात आहे. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अशी ठाकूर यांची प्रतिमा आहे. मुलायमसिंह यादवांनी फोन करून या ठाकूरांना धमकावले होते. ते फोन रेकार्ंडग खूपच गाजले होते. तो विषय कोर्टात असतानाही मुलायमसिंह यांचे चिरंजीव अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी व्यक्तिगत आकस न बाळगता अमिताभ ठाकूर यांच्या गोपनीय अहवालात पैकीच्या पैकी मार्कस दिले होते. याउलट योगी अदित्यनाथांनी अमिताभ ठाकूर यांचा गोपनीय अहवाल खराब करून त्यांना पोलीस सेवेतून निवृत्त व्हायला भाग पाडले, असा आरोप केला जात आहे. योगींनी पोलीस सेवेतून बाहेर काढल्यापासून अमिताभ ठाकूर हे ‘जबरिया रिटायर आयपीएस’ असे आपल्या नावापुढे लिहीत असतात. अशा सगळ्या कारणांमुळे चर्चेत असल्याने अमिताभ ठाकूर योगींना चांगलीच टक्कर देतील अशी विरोधकांना आशा आहे. योगी हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे योगी विरूद्ध जबरिया रिटायर आयपीएस ठाकूर अशी ही निवडणूक रंगत आणेल.


























































