दिल्ली डायरी – शिवराजसिंग यांचे ‘इकडे आड तिकडे विहीर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

मध्य प्रदेशची सत्ता भाजपला तशी पचनी पडलेली नाही. कोरोनाच्या महामारीत शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्रीपद काबीज केले खरे. मात्र कोरोनामुळे अधिवेशनच गुंडाळावे लागले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आणि शिवराजसिंग यांना कोरोना संकटाशी एकटय़ालाच तोंड देण्याची वेळ आली. त्यात लांबलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचे टेन्शनही आहेच. कोरोना आणि राज्यसभा निवडणूक यामुळे शिवराजसिंग चौहान यांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे.

देशात ‘कोरोना’चा फैलाव होत असताना गेल्या महिन्यात    केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशामधील काँग्रेस सरकार घालवून तिथे ‘कमळ’ फुलवले. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची ‘अनिच्छा’ असूनही संसदेचे अधिवेशन लांबवले गेले. अर्थात, एवढे सोपस्कार पार पाडूनही मध्य प्रदेशची सत्ता भाजपला तशी पचनी पडलेली नाही. कोरोनाच्या महामारीत शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्रीपद काबीज केले खरे. मात्र कोरोनामुळे अधिवेशनच गुंडाळावे लागले आणि आमदारांच्या शपथा, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यसभा निवडणूक  लांबणीवर पडली. साहजिकच एकटय़ा शिवराजमामांना कोरोनाच्या  लढाईत राज्यात उतरावे लागले आहे. त्यांच्या दिमतीला असलेल्या एका आयएएस अधिकार्‍यालाही कोरोनाची लागण झाल्याने मध्य प्रदेशात सध्या कोरोनाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. इंदूरसारखे सुंदर शहर कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ बनले आहे. शेवटी एकटे मुख्यमंत्री कुठे कुठे पुरणार?

सत्तेचा हव्यास वाईट असतो. येनकेनप्रकारेण मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आणायचेच, असा विडा केंद्रातील भाजप श्रेष्ठींनी उचलला. तो पूर्णत्वासही नेला. तेथील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले आणि भाजपचे शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री झाले. मात्र त्याचवेळी मध्य प्रदेशमध्येही कोरोनाच्या महामारीने थैमान घातले. मुख्यमंत्रीपद तर मिळाले पण मंत्रिमंडळ नाही, अशात दुहेरी संकटात सापडलेले शिवराजसिंग चौहान सध्या एकटेच कोरोनाशी लढा देत आहेत. मुख्यमंत्री असले तरी माणूस म्हणून शिवराज यांना मर्यादा आहेतच. एवढे मोठे राज्य एकहाती सांभाळताना त्यांची दमछाक होत आहे. त्यातच राज्यसभेच्या दोन जागा जिंकायच्याच, या दिल्लीच्या आदेशाचेही टेन्शन आहे. मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास होण्याची चिन्हे नाहीत. समजा झालाच तर, कोणाकोणाला खूश करणार हीदेखील मोठी डोकेदुखी आहेच. काँग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपवासी झालेले काँग्रेसचे 22 आमदार मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत. दुसरीकडे भाजपचीही जुनीजाणती आणि निष्ठावान मंडळीदेखील मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहेत. एक जरी आमदार नाराज झाला आणि त्याने विरोधात मतदान केले तर राज्यसभेच्या निवडणुकीचे गणित मध्य प्रदेशमध्ये चुकू शकते. त्यामुळे शिवराजसिंग चौहान यांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे. मध्य प्रदेशात सरकार आणले असले तरी ते टिकविण्यासाठी पावलोपावली कशा अग्निपरीक्षा भाजपला दय़ाव्या लागणार आहेत याचा प्रत्यय भाजप सध्या मध्य प्रदेशात घेत आहे. आमचीच हाय भाजपला लागली, असा तळतळाट काही काँग्रेसजन देत आहेत.

कोरोनाचा ‘देश प्रवेश’ आणि भाजपचा मध्य प्रदेशातला ‘सत्ता प्रवेश’ जवळपास एकाच वेळी झाला. त्यानंतरचे जवळजवळ पंचवीस दिवस ‘बिना मंत्रिमंडळाचे सरकार’ चालविण्याचा पराक्रम शिवराजसिंग चौहान यांनी केला आहे. कर्नाटकातील भाजपचेच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा याबाबतचा विक्रम चौहान यांनी मोडला आहे. यानिमित्ताने राजकारणात ‘चाल, चरित्र आणि चेहरा’ हे निव्वळ घोषणेपुरता असते, हेही सिद्ध झाले आहे. चौथ्यांदा मुख्यमंत्री होणे ही खरे तर कोणाच्याही आयुष्यातील मोठी अचिव्हमेंट. मात्र अवघ्या पंचवीस दिवसांत शिवराज यांना मुख्यमंत्रीपद नकोसे झाल्यासारखी स्थिती आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासकीय फेरबदल होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले. मंत्रिमंडळ विस्तारही होऊ शकला नाही. त्यामुळे एकटे शिवराजसिंग कोरोनाविरुद्धच्या रणांगणात एकमेव तलवारीनिशी उतरले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे झालेला प्रशासकीय बट्टय़ाबोळ शिवराज सरकारसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. प्रत्येक घरात जाऊन चौकशी करा, या सरकारी फर्मानामुळे सरकारविरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. कोरोनाला आळा घालण्याच्या सर्व उपाययोजना तोकडय़ा पडत आहेत. त्याचा फटका भाजपला आणि शिवराजसिंग चौहान यांच्या प्रतिमेलाही बसू शकतो. शिवाय शिवराज सरकारच्या स्थैर्याबाबतही साशंकता निर्माण होऊ शकते. या सगळय़ा खडतर आव्हानांना शिवराजसिंग चौहान कसे तोंड देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एक विवाह ऐसा भी!

आपल्या देशात कोणत्या विषयावर राजकारण होईल, याचा काही भरवसा नाही. राजकारण हा आपल्याकडचा आवडता विषय तो लोकांनाही चवीने चघळायला आवडतो. आजकाल सोशल मीडियामुळे ही आवड तर ‘सर्वव्यापी’ झाली आहे. वास्तविक लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खासगी आणि महत्त्वाचा विषय. मात्र देशाचे माजी पंतप्रधान देवगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी यांचा विवाह सध्या राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. निखिल हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांचे चिरंजीव. निखिल यांनी नववधूसोबत शंभर वऱहाडी आणि ब्राह्मणांच्या साक्षीने सात फेरे घेतले. इकडे पंतप्रधानांनी कोरोनामुळे देशाला ‘सप्तपदी’ आखून दिलेली आहे. मात्र निखिल यांनीही ‘सप्तपदी’ मोडली. त्यामुळे सध्या या नवदांपत्याला शुभेच्छांऐवजी देशभरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. पुन्हा लग्नात मास्क न लावता इतकी वऱहाडी मंडळी एकत्र जमलीच कशी? कुठे गेले सोशल डिस्टन्सिंग? असे प्रश्न आता सोशल मीडियावरून विचारले जाऊ लागले आहेत. एवढं सगळं होऊनही कुमारस्वामी महाशयांनी मास्क घालावा असा काही नियम नाही आणि तो गरजेचाही नाही, असे सांगत बिना मास्कच्या विवाहाचे समर्थन केले. अर्थात, यावर टीका करणारे भाजपवाले त्यांच्याच पक्षाचे कर्नाटकातले मातब्बर नेते खाणसम्राट श्रीरामलू यांनीही कोरोना नुकताच सुरू झाल्यानंतर आपल्या मुलीचा विवाह धुमधडाक्यात केला होता, हे विसरत आहेत. त्यावर काहूर माजले नाही, पण निखिल कुमारस्वामींच्या नशिबी मात्र ते आले. कोणाच्याही लग्नाचे राजकारण होऊ नये.

भीलवाडा पॅटर्न

कोरोनाच्या भयावह संकटाला सामोरे जाताना राजस्थानातील भीलवाडा जिल्हय़ाने निर्माण केलेला ‘पॅटर्न’ देशासाठी आदर्श ठरत आहे. कोरोनाचा सर्वात पहिला शिरकाव याच जिल्हय़ात एका डॉक्टरमुळे झाला. या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 27 जणांना नंतर कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर भीलवाडाची ‘इटली’ होण्याची भीती व्यक्त होऊ लागली. मात्र झाले उलटेच. तेथिल जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी जिल्हय़ात तत्काळ बेमुदत संचारबंदी लागू केली. आवश्यक ती उपाययोजना कठोरपणे अमलात आणल्यामुळे भीलवाडातील कोरोनाचा प्रसार रोखता आला. भीलवाडा हा देशात पॅटर्न ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात नेहमीप्रमाणे राजकारण घुसले. भाजपने तेथील एका महिला सरपंचाला हाताशी धरून हे श्रेय राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारचे नसून नरेंद्र मोदींचे आहे, असे व्हिडीओ पसरवायला सुरुवात केली. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झालेल्या टीना डाबी नावाच्या महिला अधिकार्‍याने याचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न केला. त्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली. मुळात टीना डाबी या एसडीएम आहेत आणि अधिकार किती, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अखेर काँगेसी सरकारचा असला तरी राजेंद्र भट्ट यांचा ‘भीलवाडा पॅटर्न’ केंद्रातील कॅबिनेट सेक्रेटरींनी दिल्लीत मागवून घेतला. त्यावर बरहुकूम आता ‘कोरोना हटाओ’चे काम सुरू आहे.

[email protected]