दिल्ली डायरी – हरीश रावत यांचे ‘गीत गाता चल’

harish-rawat

काही महिन्यांपूर्वी उत्तराखंडमध्ये भाजप सपाटून मार खाईल असे चित्र होते. काँग्रेसच्या बाजूने देवभूमीची हवा जात असल्याचे लक्षात येताच यशपाल आर्यांसारख्या तिथल्या राजकीय हवामानतज्ञ मंडळींनी तत्काळ पक्षांतरही करून काँग्रेसचा झेंडाही हाती घेतला. आर्यांपाठोपाठ हरकसिंग रावत आणि इतर नाराजही काँग्रेसचा हात हात घेतील, असा कयास लावला जात होता. मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी ऐन निवडणुकीच्या मोसमात राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली आणि हिमालयात जाण्याची तयारी दाखविली. त्यामुळे देवभूमीचे राजकारण हादरले. मात्र, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी राजकीय परिपक्वता दाखवत रावत यांचा बंडोबाथंड केला. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे थेट आश्वासन दिले नाही, मात्र, मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून देवभूमीकडे त्यांची रवानगी केली. बंडाची भाषा करणाऱ्या हरीश रावत यांनी आता काँग्रेस के गीत गाता रहूंगा.. उत्तराखंड पर जिंदगी लुटाता रहूंगा’, असे गीत गाता चलम्हणत पुढची तयारी केली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे बंड तूर्त थंड झाले  आहे. काँग्रेस हायकमांडने यांना समजूत घालून पुन्हा राज्यात पाठविले आहे. रावत यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी काही ठोस आश्वासन न देता त्यांना शांत केले, ही राहुल-प्रियांका यांची राजकीय मुत्सद्देगिरी म्हणावी लागेल. आता हरीश रावत कामाला लागले असले तरी त्यांच्यावर टीका होत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी त्यांच्यावर तीर मारला आहे. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या काँग्रेसमध्ये काही हटके प्रयोग करीत आहेत. पंजाबसारख्या जाट शीखबहुल राज्यात राहुल यांनी चरणजितसिंग चन्नी यांच्या रूपाने दलित मुख्यमंत्री नेमण्याचे धाडस दाखविले. राहुल यांनी हा प्रयोग पंजाबमध्ये करावा यासाठी त्या वेळी हरीश रावत यांनीच प्रोत्साहन दिले होते. मात्र हा दलित मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला आपल्यावरही उलटेल याची कल्पना रावत यांना नव्हती. तथापि उत्तराखंडमध्येही हाच प्रयोग होईल, याची भनक लागल्याने हरीश रावत अस्वस्थ झाले. त्यामुळेच अमरिंदर यांनी ‘जैसी करनी वैसी भरनी’, अशी टीका रावत यांच्यावर केली आहे. वास्तविक, काँग्रेस हायकमांड आणि हरीश रावत यांच्यामध्ये तसे सौहार्दपूर्ण संबंध कधीच नव्हते. 2000 साली काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हरीश रावत यांनी सोनिया गांधींविरोधात जितेंद्र प्रसाद यांना जिवाभावाने साथ दिली, मात्र जितेंद्रप्रसाद पराभूत होत आहेत हे दिसताच रावत यांनी चतुराईने काँग्रेस हायकमांडच्या पाठीशी उभे राहण्याचा राजकीय धूर्तपणा दाखविला, मात्र या सगळ्यात रावत उघडे पडले. त्यामुळे हरीश रावत कधीही काँग्रेस हायकमांडची मुख्यमंत्रीपदाची पहिली पसंती राहिले नाहीत. सुरुवातीला एन. डी. तिवारी आणि त्यानंतर विजय बहुगुणा यांना पक्षाने संधी दिली. उत्तराखंडच्या प्रलयानंतर बहुगुणा यांच्या निक्रियतेमुळे हरीश रावत यांना काँग्रेसने नाइलाजाने संधी दिली. आता मुख्यमंत्रीपद खुणावत असल्याने रावतांनी सुरुवातीला काँग्रेसचे प्रभारी पद सोडले. आता आपल्या मर्जीनुसार काँग्रेस उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी ते आग्रही आहेत. राहुल यांनी रावत यांची ही मनमानी मोडीत काढली. त्यामुळे हरीश रावत म्हणे खट्टू झाले. राजकारणातून संन्यास घेण्यासंबंधी सूचक ट्विट करून खळबळ उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेसने रावत यांची फारशी दखल घेतली नाही. आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा, ही मागणीही हायकमांडने केराच्या टोपलीत टाकली. हरीश रावत यांच्या बंडाचा हायकमांडने पद्धतशीरपणे ‘आपल्या स्टाइल’ने थंडोबा केला. या बंडोबा, थंडोबाच्या नादात उत्तराखंडसारखे देवभूमीचे हातात आलेले राज्य काँग्रेसने गमावू नये इतकेच!

बोल कोणास लावावा?

संसदेत उपस्थित राहण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांची या अधिवेशनात चांगलीच खरडपट्टी काढली. पंतप्रधानांची यामागची भूमिका भलेही प्रामाणिक असेल. मात्र दस्तरखुद्द पंतप्रधानच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केवळ नमनालाच उपस्थित राहिल्याने बोल कोणास लावावे, असा प्रश्न ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सध्या दबक्या आवाजात विचारला जात आहे. भाजपच्या राजकीय उत्कर्षामागे 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कारणीभूत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी खासदारांना बोल लावले त्यामागची तळमळ खासदारांनी समजून घ्यायला हवी. खासदारांनी ती तशी समजूनही घेतली असती, मात्र मंगळवारी होणाऱ्या खासदारांच्या दोन्ही बैठकांना पंतप्रधान अनुपस्थित होते. इतकेच नाही तर संसदेवरील अतिरेकी हल्ल्याला वीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आयोजित शहीदांच्या श्रद्धांजली कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित नव्हते. बिपीन रावत यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमालाही पंतप्रधान हजर नव्हते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारामुळे पंतप्रधानांचा बहुतांश वेळ उत्तर प्रदेशात पक्षाची इभ्रत वाचविण्यात जात आहे. पंतप्रधानच संसदेत उपस्थित नाहीत हे पाहून भाजपच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासालाच दांडी मारण्याचा पराक्रम करून दाखविला. एकेदिवशी अध्यक्षांनी नावे पुकारलेल्या 13 खासदारांपैकी भाजपचे नऊ खासदार अनुपस्थित होते. गमतीचा भाग म्हणजे ज्यांच्यावर पक्षाचे खासदार सभागृहात हजर ठेवण्याची जबाबदारी आहे, असे भाजपचे लोकसभेतील प्रतोद राकेशसिंगच प्रश्नोत्तराच्या तासांत ‘बेपत्ता’ होते. आता बोला… बोल कुणाला लावायचे ते?

थोडी थोडी पिया करो…!

जीतनराम मांझी हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. या महाशयांचा असा परिचय करून देण्याचे कारण म्हणजे लक्षात राहण्याजोगे कोणतेही कार्य यांच्या हातून घडलेले नाही. अधूनमधून वादग्रस्त विधाने करून ते बिहारपुरते का होईना चर्चेत राहत असतात. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील आंब्यावरून त्यांचे नितीशबाबूंशी कडाक्याचे भांडण झाले होते. एवढे मोठे कार्य त्यांच्या गाठीशी! नुकतेच मांझी यांनी एका जातीविषयी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल झाली, मात्र त्यापासून कोणताही बोध न घेता मांझी यांनी मोठा सामाजिक उपदेश दिला आहे. ‘थोडी थोडी पिया करो… रात को दस बजे के बाद बाहर मत निकलो… स्वस्थ रहो…’ हा दारूबाजीचा अमूल्य असा संदेश मांझी यांनी बिहारमधील गोरगरीब जनतेला दिला आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार दारूबंदीचा नारा देत असताना जीतनराम यांनी थोडी थोडी पिया करो, सांगत मदिराप्राशनाची जोरदार तरफदारी केली आहे. त्यामागचा आनंद त्यांनी विदित केला आहे. बिहारमध्ये दारूबंदी करून नितीशबाबूंनी एक भले काम केले आहे. भलेही त्यामागे राजकीय गणित आणि पब्लिसिटी स्टंट असेल तरीही एक मुख्यमंत्री म्हणून त्यांचे हे काम वाखाणण्याजोगेच आहे. बिहारसारख्या गरिबी आणि अज्ञान असलेल्या राज्यात हे काम करणे तसे जोखमीचे होते, मात्र नितीशबाबूंच्या या प्रामाणिक प्रयत्नांवर जीतनराम यांनी पाणी फेरले आहे. मदिरासेवनाचे एक शेडय़ूल त्यांनी जनतेपुढे ठेवले आहे. रात्री दहानंतर प्या आणि मस्त घरात बसा, असा अमूल्य संदेश देणाऱ्या जीतनराम यांच्याविरोधात नितीशबाबू काय ‘ऍक्शन’ घेतात ते बघूयात.