
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पााकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळाभेट घेत पंतप्रधान इमरान खानवर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या व पुलवामा हल्ल्यानंतरही पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लक्ष्य केलं आहे. सतत पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या सिद्धू यांनी त्यांचा मित्र इमरान खान याला समजवावं. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत असं सिंह यांनी म्हटलं आहे.
पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. हे स्पष्ट झाले असून जैशनेच पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवादी आदिल दार याला प्रशिक्षण दिले होते. हे जगजाहीर झाल्यानंतरही सिद्धू यांनी या भ्याड हल्ल्यासाठी संपू्र्ण देशाला जबाबदार ठरवणे योग्य नाही असे म्हटले होते. दहशतवादयांना वेळ व धर्म नसतो. जगात चांगली, वाईट माणसं असतात. प्रत्येक संस्थेत, देशात अशी माणसं असतात. जे वा्ईट आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहीजे. पण एखाद्या वा्ईट माणसाच्या भ्याड कृत्यासाठी सगळ्यांनाच दोषी ठरवणे योग्य नाही. असे सांगत सिद्धू याने पाकिस्तानची पाठराखण केली होती. सिद्धू याच्या या पाकिस्तानप्रेमावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याचपार्श्वभूमीवर सिंह यांनी सिद्धू यांना टोला लगावला आहे. दरम्यान, त्यांनी इमरान खान यांना दहशतवादी हाफिज सईद, मसूद अजहर यांना हिंदु्स्थानच्या ताब्यात देण्यास सांगितले आहे. तसेच असे केल्यास पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत तर होईलच शिवाय नोबेल शांति पुरस्कारासाठी तुमच्या नावाचाही विचार होईल. असेही सिंह यांनी म्हटले आहे.



























































