डॉक्टर मारहाण प्रकरण, खासगी डॉक्टरांचा आज देशव्यापी संप

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवार, 17 जूनला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या एकदिवसीय संपात ‘ओपीडी’सारखी सेवा सोमवार सकाळी 6 ते मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, अत्यावश्यक आणि अपघात, आयसीयू सेवा सुरू राहणार आहे.

देशातील खासगी डॉक्टरांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. देशभरातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्णालयांसाठी सर्वसमावेशक असा केंद्रीय कायदा बनवावा. सुरक्षा मापदंड आणि मारहाणीबाबत सरकारने गंभीर राहून त्यावर कार्यवाही करावी, केंद्रीय कायद्यात मारहाण करणाऱयांविरोधात भारतीय दंड विधाना (आयपीसी)अंतर्गत कठोर कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी मागणी ‘आयएमए’ने केली.

डॉक्टरांच्या या मागण्या आहेत!
रुग्णालये ‘सेफ झोन’ जाहीर करावीत.
रुग्णालयांना तीन स्तरांची सुरक्षा पुरावावी.
सीसीटीव्ही बसवावेत, रुग्णांच्या नातेवाईकांच्या संख्येवर मर्यादा घालावी.
देशभरात केंद्रीय कायदा बनवावा.
मारहाण करणाऱयांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा.
बैठकीला पत्रकारांनाही बोलवा!

आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर कुठेही बैठकीला तयार आहोत. त्यांनी बैठकीची वेळ आणि ठिकाण ठरवावे. पण या बैठकीला प्रसारमाध्यमांना, पत्रकारांनाही बोलवावे. बंद दाराआड कोणतीही चर्चा होणार नाही, अशी भूमिका आता पश्चिम बंगालच्या डॉक्टरांनी घेतली आहे. बंद दाराआड बैठक घेऊन चर्चा करू, अशी भूमिका ममता यांनी घेतली होती.

सहाव्या दिवशीही रुग्णांचे हाल
ज्युनिअर डॉक्टरांनी संप मागे घेतला असला तरी रुग्णांचे हाल काही संपलेले नाहीत. पश्चिम बंगालमधील राज्य सरकारच्या अखत्यारितील रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे कामकाज अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. उपचार तसेच नियोजित शस्त्रक्रिया रद्द झाल्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे प्रचंड हाल सुरूच आहेत. सोमवारपर्यंत तरी रुग्णालयांतील कामकाज सुरळीत होईल, अशी अपेक्षा रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात एमबीबीएसच्या 3670 जागा वाढणार
सात नव्या सरकारी मेडिकल कॉलेजना मान्यता
सिंधुदुर्ग, नंदुरबार, बुलढाणा, परभणी, अमरावती, नाशिक, सातारा येथील जिल्हा रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा मिळणार