Election – दिल्लीत जदयूची भाजपसोबत युती कशासाठी? जदयूच्या ज्येष्ठ नेत्याचे नितीश कुमार यांना पत्र

जनता दल युनायटेडची बिहारमध्ये भाजपसोबत युती आहे; परंतु पक्षाने पहिल्यांदाच दिल्ली विधानसभेसाठी भाजपसोबत युती केल्याच्या पार्श्वभूमीवर जदयूचे ज्येष्ठ नेते पवन के. वर्मा यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे.

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये निवडणूक लढताना ‘आरएसएसमुक्त हिंदुस्थान’ अशी घोषणा केली होती, परंतु नंतर त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करून 2017 मध्ये भाजपसोबत युती केली याचीही वर्मा यांनी नितीश कुमार यांना आठवण करून दिली आहे. एकीकडे देशभरात सीएए-एनआरसी आणि एनपीआरला प्रचंड विरोध होत आहे. बऱ्याच मोठय़ा कालावधीपासून भाजपसोबत राहिलेल्या शिरोमणी अकाली दलनेही दिल्लीत भाजपसोबत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. असे असताना आपण भाजपसोबत का जात आहोत याचे याचे मला आकलन होत नसल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे. पक्षाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नितीश कुमार यांनी एखाद्या औपचारिक बैठकीत पक्षाची वैचारिक भूमिका नेमकी काय आहे ते मांडण्याचीही मागणी वर्मा यांनी केली आहे.

मोदी आणि त्यांची धोरणे देशविरोधी
2012 मध्ये वर्मा यांनी नितीश कुमार यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यावेळी नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांची धोरणे देशविरोधी असल्याचे म्हटले होते. भाजप देशातील विविध मोठय़ा संस्थांना देशोधडीला लावत असून लोकशाही आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नितीश कुमार यांचे मत होते याबद्दलही वर्मा यांनी पत्रात लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या