
दिल्ली विधानसभा निवडणूक यंदा हायटेक होणार आहे. मतदारांसाठी चांगली सुविधा वाढवण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले आहे. दिल्लीत मतदानावेळी मतदारांना मोबाईल नेण्याची परवानगी असेल. तसेच मोबाईलमधील क्युआर कोडच्या मदतीने मतदानही करता येईल.
क्युआर कोडची सुविधा असल्याने मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीच्या एकूण 2 हजार 689 ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र बनवण्यात येणार आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
क्युआर कोडची व्यवस्था
निवडणूक आयोग मतदारांना एक मतदार पावती पाठवणार. त्यावर एक क्युआर कोड असणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला मतदान केंद्रात प्रवेश मिळेल. जर तुम्हाला ही पावती मिळाली नसेल किंवा राहिली असल्यास वोटर हेल्पलाईनच्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला ही पावती मिळू शकते. तेव्हा मतदान केंद्रावरील बूथ लेवल अधिकारी तुमच्या मोबाईलवरील क्युआर कोड स्कॅन करून तुम्ही मतदान करू शकता.


























































